अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी राजकारणी अरुण गवळी याची अखेर 18 वर्षांनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून मंजूर झालेल्या जामिनानंतर आज (३ सप्टेंबर) त्याला तुरुंगातून मुक्त करण्यात आलं.
गवळीवर 2007 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. मुंबईतील घाटकोपर परिसरात जामसांडेकर यांची त्याच्याच निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 2012 मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने अरुण गवळीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.
गवळीने मागील अनेक वर्षांपासून जामिनासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या बाजूने निर्णय दिला आणि जामीन मंजूर केला. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने जामिनासाठी आवश्यक अटी व शर्ती निश्चित केल्यानंतर जामिनाची अधिकृत ऑर्डर नागपूर कारागृहात पाठवण्यात आली.
आज सकाळी ती ऑर्डर प्राप्त होताच, संबंधित प्रक्रिया पूर्ण करून अरुण गवळीची कारागृहातून अधिकृतपणे सुटका करण्यात आली.