उत्तर भारतात यावर्षीच्या पावसाळ्यात निसर्गाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. जून महिन्याच्या शेवटीपासून जुलै-ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची मालिकाच सुरु राहिली. हवामान खात्याने सुरुवातीपासूनच जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता; मात्र प्रत्यक्षात झालेल्या पावसाने सर्वसामान्यांपासून प्रशासनापर्यंत सर्वांचीच चांगलीच तारांबळ उडवली. जूनपासून सुरु झालेल्या मान्सूनदरम्यान काही दिवसांच्या अतिवृष्टीमुळे अनेक राज्यांत पूरस्थिती, भूस्खलन, वाहतूक ठप्प, शेतीचे नुकसान आणि जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसले. यामध्ये आर्थिकहानी झालीच त्याचसोबत अनेकांचे घर, कुटुंब उद्धवस्थ होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी सुद्धा झाली आहे.
उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंड या राज्यांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. यामध्ये सगळ्यात जास्त फटका डोंगराळ भागातील भागांना बसला आहे. उत्तर भारतातील अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या पावसामुळे भूस्खलन झाले असून शिमला, किन्नौर, मंडी, कुल्लू या भागांमध्ये रस्ते खचले, घरे कोसळली, गाड्या वाहून गेल्या. अनेक पूल वाहून गेले आणि गावांचा संपर्क तुटला त्यामुळे बचावकार्यात सुद्धा अनेक अडथळे आले. अनेकदा झालेल्या ढगफुटीमुळे याचा परिणाम चारधाम यात्रेवरही झाल्याने देशभरातून अनेक भाविक तिथे अडकले होते. नद्यांच्या अचानक वाढलेल्या पाणीपातळीमुळे अनेक नद्यांना पूर आला तर काही नद्यांनी धोक्यांची पातळी ओलांडून नागरी वस्तीत शिरकाव केला.
यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून त्याचे पाणी उत्तर प्रदेशातील काही गावांमध्ये घुसले असून याचा परिणाम अनेक राज्यांच्या भागांना सुद्धा बसला आहे. दिल्लीतील लोदी रोड, कश्मिरी गेट, आयटीओ यांसारख्या भागात पाणी साचून वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गंगा, घाघरा, यमुना यांसारख्या नद्या पूरपातळी ओलांडून वाहू लागल्याने ग्रामीण भागातील हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अनेक कुटुंब या महाप्रलयामुळे रस्त्यावर आले अर्थात बेघर झाले आहे. तसेच, उत्तर भारतातील शेतांमध्ये पाणी साचल्याने मोसमी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यांमध्ये गहू, मका, भात यांसारख्या पिकांचे नुकसान झाले आहे.
सरकारीने सांगितलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत उत्तर भारतात मुसळधार पावसाने घडलेल्या दुर्घटनांमध्ये शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले असून सुमारे 1000 हुन अधिक लोकांना बेघर व्हावे लागले. भूस्खलन, ढगफुटी यांमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात गंभीर परिणाम झाला. राष्ट्रीय महामार्ग बंद पडले असून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच, हवाईसेवाही अनेकदा रद्द करण्यात आल्या. राज्य सरकारांसह केंद्र सरकारने आपत्कालीन पथकं, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (NDRF), सेना आणि हवाई दल यांना मदतकार्यांसाठी तैनात केले असून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. भारताच्या अनेक राज्यातून बेघर कुटुंबांना अन्नधान्य, पाणी, औषधे आणि तात्पुरती निवारा व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मदत कऱण्यात आली.
उत्तर भारतात यावर्षीचा पाऊस ही केवळ नैसर्गिक आपत्ती नव्हे, तर मानवनिर्मित चुकीच्या नियोजनाचा परिणाम देखील आहे. या वर्षीच्या पावसाने हवामान बदलामुळे अत्यंत पर्जन्यवृष्टीची शक्यता वाढवली असल्याचे दाखवून दिले. अतिरेकी पावसामुळे डोंगराळ भागात भूस्खलन आणि शहरी भागात पाणी साचण्याची समस्या गंभीर झाल्याने अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे. हजारो कोटींचं आर्थिक नुकसान, शेकडो जीवितहानी आणि उद्ध्वस्त झालेल्या घरांमुळे लोक अजूनही विस्थापित अवस्थेत आहेत. हवामान बदलाचा वेग आणि त्याचे परिणाम लक्षात घेता, केंद्र व राज्य सरकारांनी दीर्घकालीन उपाययोजना आखणं ही आता काळाची गरज आहे.
- प्रीती हिंगणे (लेखिका)