मुंबईला मायानगरी म्हणून ओळखली जाते. या मायानगरीसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यातच कामावर जाणाऱ्या प्रवाशांची आज चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र दिसत आहे. यातच लोकल सेवा विस्कळीत झाली असून मोनो रेल देखील पावसातच अडकल्याने मोनो सेवा विस्कळीत झाली होती, आता ही सेवा काही तासांनंतर पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
यंदा पावसाळ्यात आणि याच महिन्यात मोनो रेल सेवा विस्कळीत होण्याची ही दुसरी वेळ आहे. मुंबई येथील वडाळा येथून चेंबूरकडे जाणारी मोनोरेल अचानक बंद पडली, त्यामुळे फायर ब्रिग्रेडला बोलावून मोनो रेल मध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. मोनो रेल मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने हा प्रकार घडला.
रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यावर आपण सहज प्रवाशांना बाहेर काढू शकतो परंतु मोनो रेलचा ट्रॅक जमिनीलगत नसल्याने प्रवाशांना बाहेर काढणे कठीण जाते. अशावेळी प्रवाशांना रेस्क्यू करून काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागते. दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे बस सेवा आणि लोकल सेवा विस्कळीत झाली त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोनो रेलचा एकमेव सहारा होता. परंतु आज सकाळच्या सुमारास भर पावसात ही मोनोरेल सेवा देखील बंद पडल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
या मोनोरेल मध्ये एकूण 19 जण अडकले होते. अग्निशमन दालने पाचहरण केल्यानंतर लॅडर च्या मदतीने एकूण 17 प्रवाशांना सुरक्षितरित्या दुसऱ्या मोनोरेल मध्ये हलविण्यात आले होते. त्यानंतर तब्बल अडीच तासांच्या प्रयत्नानंतर तांत्रिक चमूच्या मदतीने मोनोरेल दुरुस्त करून ट्रक वरून हलविण्यात आली. त्यानंतर मोनोरेलची ही सेवा पूर्व पदावर आली असून मोनोरेलचे वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे.