गेल्या काही दिवसापासून सायबर हल्ल्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हे प्रमाण कमी न होता वाढत चालल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर आळा घालणे फार गरजेचे असून पुण्यात आणखी एक फसवणुकीची घटना उघड झाली आहे.
पुणे सायबर पोलिसांनी हैदराबाद येथे राहणाऱ्या 34 वर्षीय पीएचडीधारक व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने पुण्यातील शिक्षण संस्थेची फसवणूक केली असल्याची माहिती उघड झाली आहे. त्याने तब्बल 2.5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लागवण्यात आला असून या रकमेपैकी 1.5 कोटी रुपये त्याने ऑनलाइन बेटिंगच्या व्यसनावर खर्च केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी दोन दिवस तळ ठोकून आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आयआयटी-बॉम्बेच्या एका माजी प्राध्यापकाचे नाव वापरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंना संपर्क साधला होता. तो स्वतः आयआयटी-बॉम्बेचा प्राध्यापक असल्याचे त्याने भासवून दिले. आणि सरकारी प्रकल्पांसाठी निधी मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
यानंतर माजी कुलगुरूंनी एका शिक्षण संस्थेच्या मुख्य शिक्षण अधिकाऱ्याला संपूर्ण प्रकारसांगितलं आणि आलेले संपूर्ण मेसेज पाठवले. त्यानंतर या व्यक्तीने त्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून निधी मिळवून देण्याच्या बहाण्याने तीन टप्प्यांत पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सूरु आहे.