शारदीय नवरात्रीतील पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. स्कंदमाता हे दुर्गेच्या नऊ रूपांपैकी पाचवे रूप आहे. स्कंदमाता या नावाचा अर्थ आहे, ‘स्कंद’ म्हणजे भगवान कार्तिकेय आणि ‘माता’ म्हणजे आई, म्हणून स्कंदमाता म्हणजे भगवान कार्तिकेयची आई, असा होतो. स्कंदमाता प्रेम आणि मातृत्वाचे प्रतीक मानली जाते. स्कंदमाता कमळाच्या आसनावर विराजमान असल्याने त्यांना ‘पद्मासना’ असेही म्हणतात. देवीचे वाहन सिंह आहे, जे धैर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. स्कंदमातेला चार भुजा असून त्यांच्या वरच्या दोन हातांत कमळाची फुले आहेत, तर एका हातात भगवान स्कंद म्हणजेच कार्तिकेय बालरूपात बसलेले आहेत आणि दुसरा हात अभय मुद्रेत आहे. देवी स्कंदमाता श्वेत वर्णीय आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीची विधिवत पूजा केली जाते. पूजा करताना देवीला पिवळे आणि केशरी फुले, गूळ, मिठाई, नैवेद्य अर्पण केले जाते.
स्कंदमातेच्या अवताराची कथा
स्कंदमातेच्या अवताराची एक गोष्ट प्रचलित आहे, ती अशी कि,”तारकासुर नावाच्या राक्षसाने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवले होते. या वरदानामुळे त्याला केवळ शिवाच्या पुत्राकडूनच मृत्यू मिळू शकत होता. मात्र, तारकासुराला वाटले की शिव कधीही विवाह करणार नाहीत. त्यामुळे त्याला अमरत्व मिळाले आहे. परंतु, तारकासुराच्या अत्याचारामुळे त्रस्त झालेल्या देवतांच्या विनंतीवरून, शिवाने पार्वतीशी विवाह केला. त्यांच्या पुत्राने, म्हणजेच कार्तिकेयने तारकासुराचा वध केला. त्यामुळे कार्तिकेयची आई म्हणून पार्वतीला स्कंदमाता म्हणून ओळखले जाऊ लागले.
देवीच्या आराधनेचे महत्त्व
स्कंदमातेची आराधना केल्याने संतान प्राप्ती होते आणि संततीशी संबंधित समस्या दूर होतात, असे मानले जाते. त्यांची उपासना केल्याने भक्तांना सुख, शांती, समृद्धी आणि बुद्धी मिळते. तसेच संकटे आणि राक्षसी शक्तींचा नाश होतो. स्कंदमातेची आराधना केल्याने मोक्षाचा मार्ग सुलभ होतो. त्या सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे त्यांच्या उपासकांमध्ये अलौकिक तेज येते, असं म्हटलं जात.
विशेष मंत्र :
“ॐ देवी स्कंदमातायै नमः”
हा मंत्र जपल्याने देवीच्या भक्तांमध्ये मानसिक स्थिरता, आत्मविश्वास, आणि आध्यात्मिक उन्नती वाढते, असं म्हटलं जात.