जालना : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यात आंदोलन पेटलं आहे. दीपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखालील हे उपोषण आज (ता.26) दहाव्या दिवशी पोहोचलं असून या उपोषणानं राज्यव्यापी इशारा मोर्चाचं रुप घेतलं आहे. बुधवारी गांधी चमन परिसरातून निघालेल्या या मोर्चात प्रचंड जनसागर उसळला होता. “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं” आणि “देवा भाऊ, काय झालं तुझं वचन” अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेलं. याच मोर्चात धनगर समाजाला मनोज जरांगे यांच्यासारखं तोडीस तोड नेतृत्व दीपक बोऱ्हाडे यांच्या माध्यमातून मिळालं आहे.
बोऱ्हाडेंचा संघर्षमय प्रवास :
2014 मध्ये पोलीस खात्यातील नोकरी सोडून दीपक बोऱ्हाडे यांनी समाजाच्या हक्कासाठी पूर्णवेळ लढ्याचा मार्ग स्वीकारला. त्याचदरम्यान त्यांनी राजकारणात पाऊल टाकलं आणि 2014, 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुका लढवल्या पण पराभव झाला. तरीही त्यांच्या आंदोलनातून ते धनगर समाजाचे ठाम नेतृत्व बनले आहेत. 2023 मध्ये जालन्यात आंदोलन हिंसक झालं, जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्ला झाला आणि बोऱ्हाडेंचं नाव संपूर्ण राज्यभर गाजलं.
धनगर समजाची मागणी काय? :
धनगर समाजाचा संघर्ष नवा नाही. सात दशकांपासून त्यांची मागणी एकच आहे कि अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्या. पण 1950 मध्ये एका टायपिंगच्या चुकीमुळं ‘धनगर’ ऐवजी ‘धनगड’ अशी नोंद झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण समाजाला हक्काचं आरक्षण कधीच मिळालं नाही. ही चूक दुरुस्त करण्याचं आश्वासन प्रत्येक सरकारनं दिलं, पण प्रत्यक्षात काहीच झालं नाही. याच पार्श्वभूमीवर जालन्यात अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ मोठं आंदोलन सुरू आहे. मराठा समाजानंतर आता धनगर समजानेही जालना हेच आपलं केंद्र बनवलं.
आंदोलनाला वाढता पाठिंबा :
अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ सुरु असलेल्या उपोषणाला मान्यवरांचा मोठा पाठिंबा मिळतो आहे. आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, माजी मंत्री राजेश टोपे, अर्जुन खोतकर, हिकमत उढाण यांच्यासह अनेक नेते उपोषणस्थळी दाखल झाले. राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आंदोलकांना भेटून “आमचा नाही, आपला समाज म्हणा; मी शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी राहीन” असं आश्वासन दिलं.
सरकारला थेट इशारा :
बोऱ्हाडेंनी उपोषणादरम्यान स्पष्ट इशारा दिला आहे की 24 तारखेपर्यंत निर्णय झाला नाही, तर आंदोलन अधिक उग्र होईल. त्यांचं वक्तव्य “समाजाला फसवणाऱ्यांची घरं जाळून टाका” यावरून वातावरण आणखी तापलं आहे. दुसरीकडे, आदिवासी समाजाचे आमदार आमश्या पाडवी यांनी सांगितलं की धनगरांना किंवा बंजारांना एसटी आरक्षण दिल्यास ते सरकारमधून बाहेर पडतील.
पुढचं समीकरण काय? :
धनगर समाजाच्या मागणीवरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. मनोज जरांगेप्रमाणेच दीपक बोऱ्हाडे आता धनगर समाजाचं नवं नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत. सरकार झुकतं की संघर्ष उग्र होतो, हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.