मुंबई – महाराष्ट्रात असलेल्या फार्मसी म्हणजेच औषधनिर्माणशास्त्र शिक्षणावर आता संकट आलंय. सध्या सर्वत्र प्रवेश प्रक्रिया सुरु असताना राज्यभरातील 89 फार्मसी संस्थांना प्रवेश प्रक्रियेतुन बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये खास करून पदविका आणि पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थांचा समावेश आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील भरमसाठ वाढलेल्या फार्मसी संस्थांची पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान या संस्था निकष पूर्ण करत नसल्याचे आढळून आले. त्यांनी याबाबतचा अहवाल भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेकडे पाठवला. त्यानंतर भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने परिपत्रक काढून 89 संस्थांना प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. यामध्ये ‘डिप्लोमा इन फार्मसी’च्या 71 संस्था आणि पदवीच्या 18 संस्थांचा समावेश आहे.
काही वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीच्या काळात फार्मसी या क्षेत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली होती. त्यानंतर बऱ्याच फार्मसी संस्थांनी पीसीआय म्हणजे भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेकडे अर्ज पाठवले होते. त्यानंतर 220 डिप्लोमा तर 92 पदवी साठीच्या नवीन कॉलेजला परवानगी मिळाली होती.
60 टक्के संस्था अपात्र
परवानगी देण्यात आलेल्या सर्व संस्थांना देण्यात आलेले निकष पूर्ण करण्यात आले आहे का..? हे पाहण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तंत्रशिक्षण संचालनालय आणि तंत्रशिक्षण मंडळ यांनी या संस्थांची झाडाझडती घेतली. यावेळी अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नसणे, प्रयोगशाळांची कमतरता अशा अनेक त्रुटी आढळून आल्यात. तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या 220 पैकी 128 म्हणजे जवळपास 60 टक्के संस्था यांनी निकष पूर्ण न केल्याचे आढळले.