Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • या महिन्यापासून काय बदलणार? ऑक्टोबर महिन्यात आर्थिक बाबींशी निगडित कोणते बदल होणार? जाणून घ्या..
Top News

या महिन्यापासून काय बदलणार? ऑक्टोबर महिन्यात आर्थिक बाबींशी निगडित कोणते बदल होणार? जाणून घ्या..

नवी दिल्ली : प्रत्येक महिन्यात नियमांमध्ये काही ना काही बदल होत असतातच. असेच महत्वाचे नियम आगामी ऑक्टोबर महिन्यातहि बदलणार आहे. सरकारने आर्थिक बाबींशी निगडित विविध नियमांमध्ये बदल केले असून हे बदलले नियम, पुढील महिन्यापासून लागू होत आहेत. १ ऑक्टोबर २०२५ पासून कोणत्या नियमांमध्ये बदल झाले आहेत, आणि त्याचे परिणाम काय, हे जाणून घेऊया…

१. नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये मोठा बदल

१ ऑक्टोबर २०२५ पासून नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) मध्ये मोठा बदल होणार असून गैर-सरकारी क्षेत्रातील सदस्यांना मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क (MSF) खाली इक्विटीमध्ये १००% पर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी असणार आहे. म्हणजे, १ ऑक्टोबरपासून NPS चे बिगर-सरकारी सदस्य पेन्शनची संपूर्ण रक्कम शेअर बाजाराशी संबंधित योजनांमध्ये गुंतवू शकतील. यापूर्वी, इक्विटीमधील गुंतवणुकीची मर्यादा ७५% होती. यासोबतच, आणखी एक मोठा बदल म्हणजे, सरकारी क्षेत्राप्रमाणेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडूनही पीआरएएन (PRAN – Permanent Retirement Account Number) उघडण्यासाठी शुल्क आकारले जाईल. यामध्ये, ई-पीआरएएन (e-PRAN) किटसाठी १८ रुपये आणि फिजिकल पीआरएएन कार्डसाठी ४० रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच, यामध्ये वार्षिक देखभाल शुल्क प्रति खाते १०० रुपये असेल. यातील आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, अटल पेन्शन योजना (APY) आणि NPS लाइट सदस्यांसाठी पीआरएएन उघडण्याचे शुल्क आणि देखभाल शुल्क १५ रुपये असेल, तर व्यवहारांवर कोणतेही शुल्क लागू होणार नाही.

२. रेल्वे तिकीट बुकिंग नियम अधिक कडक

रेल्वे तिकीट बुकिंगममध्ये होणारे गैरव्यवहार थांबवण्यासाठी १ ऑक्टोबरपासून महत्त्वाचे बदल होणार आहेत. ते म्हणजे, आरक्षण सुरू होण्याच्या पहिल्या १५ मिनिटांत केवळ तेच प्रवासी ऑनलाईन तिकीट बुक करू शकतील, ज्यांचे आधार वेरिफिकेशन झालेले आहे. रेल्वेचे अधिकृत एजंट, आरक्षण उघडल्यानंतर पहिल्या १० मिनिटांपर्यंत तिकीट बुक करू शकणार नाहीत. या बदलांचा उद्देश तिकीट बुकिंगचा लाभ खऱ्या वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे.

३. ऑनलाईन गेमिंग विधेयकाची अंमलबजावणी

तरुणाईसह इतरांनाही असणाऱ्या ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनावर आणि आर्थिक नुकसानीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जारी केलेले Online Gaming Bill 2025, १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. दरम्यान, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १ कोटी रूपयांचा दंड होऊ शकतो. तर प्रमोटर्सना दोन वर्षांची शिक्षा आणि ५० लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. यामुळे ‘रिअल मनी गेमिंग’ उद्योगावर मोठे नियमन येण्याची शक्यता आहे.

४. तेल विपणन कंपन्या घरगुती पराच्या गॅस सोबतच ATF,CNG,PNG च्या दरात होणार बदल?

१ ऑक्टोबरपासून तेल विपणन कंपन्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम तुमच्या महिन्याच्या स्वयंपाकघरातील बजेटवर देखील होऊ शकतो. यासोबतच, एटीएफ (ATF), सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) च्या दरातही बदल होण्याची शक्यता आहे. यापूर्वी, तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल केला होता, तर १४ किलोग्रॅमच्या घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल केला नव्हता.

५. UPI मधून P2P व्यवहार हटणार?

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे १ ऑक्टोबर २०२५ पासून UPI मध्ये मोठे बदल लागू होण्याची शक्यता आहे. यामध्ये, वापरकर्त्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणारे पीअर-टू-पीअर (P2P) व्यवहार (जे दोन व्यक्तींमध्ये केले जातात) UPI ॲप्समधून हटवले जाण्याची शक्यता आहे.

६. एकाच PAN वर अनेक NPS योजनांमध्ये गुंतवणूक

पीएफआरडीए (PFRDA) च्या नवीन मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क (MSF) नुसार, NPS गुंतवणूकदारांना फक्त एकाच योजनेत गुंतवणूक करता येत होती. मात्र, आता एका पॅन नंबरवरून अनेक स्कीममध्ये गुंतवणूक करता येणार आहे. यापूर्वी, गुंतवणूकदार त्यांच्या जोखीम क्षमतेनुसार Debt, Balanced किंवा Equity आधारित योजना निवडू शकतील.

७. PF खातेधारकांना मिळणार दिलासा

ऑक्टोबर महिन्यात पीएफ (PF) खातेधारकांसाठी दोन महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. १०-११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून थेट एटीएमद्वारे पैसे काढता येतील, या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. तर किमान पेन्शनची रक्कम १,००० वरून १,५०० ते २,५०० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यावरही चर्चा होऊ शकते. याशिवाय, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) या महिन्यात आपली नवीन डिजिटल सेवा ‘EPFO 3.0’ देखील लॉन्च करण्याची शक्यता आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts