मुंबई: राज्यातील मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) आपला पारंपरिक दसरा मेळावा यंदाही शिवतीर्थावर आयोजित करण्याच्या तयारीत आहे. मात्र, या मेळाव्यावर होणारा प्रचंड खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वळवावा, अशी मागणी भाजपकडून जोर धरू लागली आहे. त्यामुळे मेळाव्याच्या आयोजनाबरोबरच राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे वादळ उठले आहे.
भाजपची टीका; मेळावा रद्द करून मदत करा
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. “पूरग्रस्तांची वेदना जाणून घेतल्यानंतर आता कृती दाखवण्याची वेळ आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी घरात बसून वेळ घालवला, आता प्रायश्चित्त म्हणून दसरा मेळावा रद्द करावा आणि त्याचा खर्च मदतीसाठी द्यावा,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले.
त्यांनी पुढे असा टोला हाणला की, “आजच्या मेळाव्यांत फक्त गद्दार, माझा पक्ष चोरीला गेला, एवढंच रडगाणं ऐकायला मिळणार आहे. शिवाय लाखो रुपये खर्च करून कार्यकर्त्यांना भुर्दंड का द्यायचा? संवेदना व्यक्त करायच्या असतील तर त्या कृतीतून दिसल्या पाहिजेत.”
ठाकरे गटाचा ठाम निर्धार
भाजपच्या मागणीला ठाकरेंच्या शिवसेनेने नाकारले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, पाऊस असो वा मैदानात चिखल, यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल. यासाठी तयारीला सुरुवात झाली असून, कुठल्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही, असा पक्षाचा निर्धार आहे. शिवसेना भवनात नुकत्याच झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नेत्यांसोबत नियोजन केले. शिवाजी पार्कवर पाऊस पडत असला तरी मैदानाची स्वच्छता, व्यवस्था आणि व्यासपीठ उभारणीचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
५९ वर्षांची परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न
दसरा मेळावा हा फक्त राजकीय कार्यक्रम नसून शिवसैनिकांसाठी परंपरेचा आणि भावनेचा प्रश्न आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून सलग ५९ वर्षे हा मेळावा शिवतीर्थावर होत आहे. बाळासाहेबांनी आपल्या भाषणातून पक्षाचा विचारसरणीचा पाया मजबूत केला. त्यानंतर गेली १२ वर्षे उद्धव ठाकरे या परंपरेला पुढे नेत आहेत. त्यामुळे मेळावा रद्द करण्याची मागणी कार्यकर्त्यांना अजिबात मान्य नाही. “शिवतीर्थावरच दसरा मेळावा होणार” या घोषणेने शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
पावसाचे सावट आणि राजकीय घडामोडी
मुंबईत सध्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवस हीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशा परिस्थितीत मैदानातील चिखल, नागरिकांची गैरसोय आणि वाहतुकीचा प्रश्न उभा राहतो. मात्र ठाकरे गटाने यावर तोडगा काढण्याचा निर्धार केला आहे. दुसरीकडे, भाजपकडून सुरू झालेली टीका राजकीय वाद निर्माण करत असून, ठाकरे गट यावर कसा प्रतिउत्तर देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावरून सुरू झालेली ही राजकीय चकमक आता सरळ पूरग्रस्त मदतीशी जोडली गेली आहे. परंपरेशी नाळ जोडलेला मेळावा आणि पूरग्रस्तांच्या मदतीचा मुद्दा यामध्ये कोणता निर्णय महत्त्वाचा ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.