अहिल्यानगर : आज अहिल्यानगर शहरात AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा पार पडणार आहे. काल मुस्लिम समाजात निर्माण झालेल्या तणावग्रस्त व वातावरणाच्या पार्श्वभूमीमुळे या सभेकडे अत्यंत संवेदनरित्या पाहिले जात आहे.
अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर भागात ही सभा होणार असून पोलीस प्रशासन या सभेकडे संवेदनशीलरित्या पाहत आहे. या सभेसाठी यापूर्वी पोलिसांकडून परवानगी मिळाली नव्हती. परंतु आता पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेत कडक अटी व शर्तींसह सभेला परवानगी देण्यात आली आहे. या सभेची तयारी युद्धपातळीवर सुरु असून सभा होणारच असा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे.
काल म्हणजेच सोमवारी अहिल्यानगर येथील कोटला गावात एका मुस्लिम धर्मगुरूंच्या नावाची विटंबना झाल्याची गंभीर घटना घडली होती. अज्ञात व्यक्तीने रोडवर मुस्लिम धर्मगुरूंचे नाव लिहून विटंबना केली. यामुळे मुस्लिम समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी एकूण चार गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी CCTV फुटेज आणि व्हिडीओ क्लिप्सच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेला परवानगी देण्यात आली नव्हती. परंतु आता पोलीस प्रशासनाने ओवैसी यांच्या सभेस परवानगी दिली आहे. परंतु, काही कडक अटी व शर्ती लावण्यात आल्या आहेत.
सभेस परवानगी, पण पोलीस प्रशासनाने लावल्या या अटी शर्ती
1) जाहिर सभा घेण्यासाठी आवश्यक लागणा-या परवानगी स्थानिक स्वाराज्य संस्था यांचेकडुन घेवुनच सभा घेण्यात यावी . स्टेज, मंडप उभारणी, एम एस ई बी, पाकींग व्यवस्था, आरोग्य विभाग, अग्निशमक विभाग यांच्याकडून मंजुरी पत्र सादर करावे.
2) जाहिर सभा घेत असताना फायर ब्रिगेड, अॅम्ब्युलन्स, अती महत्वाचे वाहने, अत्यावश्यक वस्तु वाहतुक करणारे वाहने येण्या जाणेसाठी अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन पार्किंग व्यवस्था करावी. सदर पार्किंग ठिकाणी आपले स्वयंसेवक नेमावेत. वाहतुक पोलीसांच्या सुचनांचे पालन करावे.
3) आपले पक्षाचे खासदार अससुददीन ओवेसी यांना झेड वर्गवारीची सुरक्षा आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी ४५ बाय ६० फुट लांबी रुंदीचे डी झोन तयार करुन स्टेजची व्यवस्था करावी. तसेच स्टेजवर बसणा-या प्रमुखांची नावांची यादी आगाऊ उपलब्ध करुन देवुन त्यांचे पास आमचेकडुन घ्यावेत. स्टेज सुरक्षामध्ये कोणताही निष्काळी पणा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
4) सभेच्या ठिकाणी सुरक्षाच्या अनुषंगाने सभेचे ठिकाण चारही बाजुने सुरक्षीत करुन समक्ष दिलेल्या सुचनेप्रमाणे स्वतंत्र प्रवेश व्दाराची व्यवस्था करावी जेणेकरुन सुरक्षा अनुषंगाने सोयीचे होईल याबाबत काटेकोरपणे पालन करावे.
5) जाहिर सभेच्या अनुषंगाने लावण्यात येणारे झेंडे, पोस्टर्स व बॅनर्स याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेची स्वतंत्र पारवानगी घेवुन सादर करावी.
6) आपण लावण्यात आलेल्या झेंडे व पोस्टर्स व बॅनर्स व इतर जाहिरातीमुळे कोणत्याही धर्माच्या/जातीच्या भावना दुखवतील असे वक्तव्य अथवा देखावे अथवा विभिस्त किंवा मना दुखवतील असे गाणी पोस्टर्स लावू नयेत.
7) जाहिर सभा अयोजित करताना असताना कोणावरही आपले कार्यकर्ते जबरदस्तीने सहभागी करणार नाही याची दक्षता घ्यावी. जाहिर सभा ही शांततेने व सुरळीत पार पाडणेसाठी पोलीस ज्या ज्या वेळी मिटिंगसाठी बोलविले जाईल त्यावेळेस हजर राहुन त्यावेळी देणेत आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे.
8) जाहिर सभा मध्ये महिला व मुली सहभागी असतील तर त्यांची गैर सोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. शक्यतो महिला व पुरुष असे दोन वेगवेगळे भाग करावेत.
9) जाहिर सभा असताना प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेचा/मार्गाचा वापर करावा. जाहिर सभा घेण्यापुर्वी अथवा नंतर कोणतीही रॅली काढता येणार नाही. सभेकरीता येणारे वक्ते यांना झेड सुरक्षा असलेने त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव कोठेही पोलीसांच्या परवानगी शिवाय दौ-यात बदल करता येणार नाही.
10) जाहिर सभा च्या वेळी अत्यावश्यक सेवा चालु राहितील तसेच आपले समर्थकाकडुन त्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
11] जाहिर सभेच्या दरम्यान अथवा नंतर आपले कार्येकर्ते यांचेकडुन कोणत्याही शासकीय अथवा खाजगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
12] सभेच्या ठिकाणी लाईट, स्वच्छता,पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पार्किंग याची सभेला येणा-या नागरिकांचे प्रमाणात पुरेशी सोय करण्यात यावी.