मुंबई : काल, राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत आरोग्य, उद्योग, उर्जा आणि प्रशासन या सर्व क्षेत्रासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. यात सर्वसामान्य नागरिकांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी विविध निर्णय घेण्यात आले. त्यानुसार कर्करोग उपचारांसाठी महत्वपूर्ण पाउल उचलण्यात आले आहे. त्यानुसार राज्यभरातील 18 रुग्णालयात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी ‘महाकेअर फाऊंडेशन’ स्थापन करण्यात येणार असून, यासाठी 100 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना दर्जेदार कर्करोग उपचार मिळेल.
गुंतवणूक आणि बहुराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन मिळणार
मंत्रिमंडळ बैठकीत उद्योग क्षेत्राला बळ देण्यासाठी ‘महाराष्ट्राचे जागतिक क्षमता केंद्र धोरण 2025’ या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या धोरणामुळे राज्यात गुंतवणूक आणि बहुराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन मिळेल आणि ‘विकसित भारत 2047’ या दूरदृष्टीच्या उद्दिष्टाकडे वाटचाल वेगाने होईल. तसेच ऊर्जा क्षेत्रात देखील मोठे निर्णय घेण्यात आले आहे, त्यानुसार औद्योगिक, वाणिज्यिक व इतर ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त कर आकारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निधीचा वापर प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजना आणि सौर कृषीपंपासाठी वीज पुरवठा करण्यासाठी केला जाणार असल्याचे समोर आले आहे.
राज्यसरकारच्या मंत्रिमंडळात घेण्यात येत असलेल्या निर्णयांमुळे राज्याच्या विकासाला गती मिळाली असून नागरिकांच्या कल्याणाला मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे.