मुंबई : हवामान विभागानं (IMD) महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. ‘शक्ती’ या संभाव्य चक्रीवादळाचा प्रभाव आज शनिवारपासून ते मंगळवार (7 ऑक्टोबर) पर्यंत जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMD च्या माहितीनुसार, हा इशारा मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी लागू आहे. या काळात संबंधित भागांमध्ये जोरदार वारं आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह या जिल्ह्यांना अलर्ट :
हवामान विभागानं राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीजवळील जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळ ‘शक्ती’ मुळं 4 ते 5 ऑक्टोबर दरम्यान 45 ते 65 किमी प्रतितास वेगानं वादळी वारं वाहण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, वाऱ्याचा वेग आणखी वाढू शकतो, ज्यामुळं समुद्र खवळलेला असेल. अशा स्थितीत मच्छीमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा :
शक्ती चक्रीवादळाचा फटका किनारपट्टीच नव्हे तर मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांनाही बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. शेतीसाठी या पावसाचा फायदा होऊ शकतो, मात्र अतिवृष्टीमुळं पिकांचं नुकसान होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
राज्य सरकारचा अलर्ट:
आयएमडीनं मुसळधार पावसामुळं पूर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. विशेषतः कोकण किनाऱ्यावर वादळ, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा आहे. परिणामी राज्य सरकारनं ‘शक्ती’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. राज्य सरकारनं सर्व जिल्ह्यांमधील मदत पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. लोकांना किनारपट्टीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला असून, समुद्र किनाऱ्याजवळ राहणाऱ्यांचं स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे. तसंच पर्यटकांना समुद्राजवळ जाण्याचा कटाक्षानं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.