शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे या दोन पक्षांमध्ये युती होण्याची चर्चा असताना, ठाण्यामध्ये महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नाद निवासस्थानी महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांची बैठक पार पडली असून या बैठकीला जितेंद्र आव्हाडांसोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते. या बैठकीचा व्हिडिओ स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला असून त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की,”मी, शिवसेना (उबाठा) चे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण अशा आम्हा चौघांमध्ये ठाण्यातील विविध प्रश्नांबाबत, नागरी समस्यांबाबत सुमारे तासभर चर्चा झाली.” या बैठकीत ठाण्यातील वाहतूक कोंडी, डंपिंग, पाणीटंचाई तसेच रस्ते-मेट्रो यामुळे निर्माण झालेल्या नागरी समस्यांवर चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. तर ही बैठक म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी आणि मनसे हे महायुतीविरोधात एकत्र येण्याचे हे पहिले पाऊल मानले जात आहे.
ठाण्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या, या बैठकीनंतर आता ठाण्यामध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येणार का? तसेच, मनसेच्या महाविकास आघाडीमधील एंट्रीचा शुभारंभ ठाण्यातून होणार का? आणि ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर न पडत मनसेच आघाडीमध्ये सामील होणार का?, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जितेंद्र आव्हाडांनी दिली बैठकीची माहिती
या बैठकीची माहिती स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ पोस्ट करत दिली. आव्हाड यांनी व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की,”मी, शिवसेना (उबाठा) चे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, अशा आम्हा चौघांमध्ये ठाण्यातील विविध प्रश्नांबाबत, नागरी समस्यांबाबत सुमारे तासभर चर्चा झाली.” या बैठकीत ठाण्यातील ट्रॅफिकचा मुद्दा, पाणीटंचाईचा मुद्दा आणि रस्ते, मेट्रो यांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि इतर नागरी समस्यांमुळे नागरिक हैराण झाले असून याविषयी या चार पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली.
दरम्यान, आता हे सर्व विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकवटताना दिसून येत असून महाविकास आघाडीच्या बैठकीत मनसेचे नेते दिसायला लागल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळे, आत्ता एकत्र दिसत असलेले नेते आगामी काळात निवडणुकीत देखील एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली असून महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी आणि सोबतच मनसे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, याबाबतचे संकेत या बैठकीच्या माध्यमातून दिसून येत आहेत.