चेन्नई/नवी दिल्ली : श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीने उत्पादित केलेल्या कफ सिरप कोल्ड्रिफच्या विक्रीवर तामिळनाडू, मध्य प्रदेश सरकारनं तत्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. कोल्ड्रिफ सिरप बॅच क्रमांक SR-13 (उत्पादन तारीख मे 2025, समाप्ती तारीख एप्रिल 2027) बाबत औषध नियंत्रण विभागानं तत्काळ नियामक कारवाई केली आहे. त्याचा फॉर्म्युला पॅरासिटामोल, फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड, क्लोरफेनिरामाइन मॅलेट सिरप आहे. सिरपचा हा बॅच श्रीसन फार्मास्युटिकल्स, इमारत क्रमांक 787, बंगळुरु हायवे, सनगुवरचाथिरम, कांचीपुरम जिल्हा, तमिळनाडू इथं तयार केला जातो.
तमिळनाडू सरकारला दिली होती माहिती
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात 1 ते 7 वर्षे वयोगटातील दहा मुलांच्या मृत्यूमध्ये कोल्ड्रिफ सिरप (बॅच क्रमांक SR-१३) च्या संशयास्पद भूमिकेबद्दल तमिळनाडू सरकारला 1 ऑक्टोबर 2025 रोजी मध्य प्रदेश ड्रग्ज कंट्रोल अथॉरिटीकडून माहिती मिळाली, असं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.
खोकल्याच्या सिरपमध्ये दूषितता
मुलांचं अचानक मूत्रपिंड निकामी झाल्याचं वृत्त आहे. प्राथमिक विषारी शास्त्रात सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल (DEG) दूषित असल्याचे आढळून आले. याचा अर्थ खोकल्याच्या सिरपमध्ये दूषितता होती.
विषारी आणि नेफ्रोटॉक्सिक पदार्थांनी दूषित
श्रीसन फार्मास्युटिकल्सच्या तपासणीत अनेक अनियमितता आढळून आल्या. असं आढळून आले की, कथित बॅचमध्ये नॉन-मेडिसिनल ग्रेड प्रोपीलीन ग्लायकॉल वापरण्यात आलं होतं, जे कदाचित डायथिलीन ग्लायकॉल (DEG) आणि इथिलीन ग्लायकॉल, दोन्ही विषारी आणि नेफ्रोटॉक्सिक पदार्थांनी दूषित होतं.
प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सांगितलं की, “मध्य प्रदेश सरकारच्या विनंतीवरुन, तामिळनाडू अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन (FDA) नं तामिळनाडूतील कांचीपुरम येथील मेसर्स श्रीसन फार्माच्या उत्पादन परिसरातून कोल्ड्रिफ कफ सिरपचे नमुने घेतले आहेत. या नमुन्यांवरील चाचण्यांचे रिपोर्ट ३ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी उशिरा आमच्यासोबत शेअर करण्यात आले. नमुन्यांमध्ये डीईजीचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळून आले.”
डॉक्टरला अटक
मध्य प्रदेशमध्ये खोकल्याचं औषध हे विषारी घटकांमुळे लहान मुलांसाठी प्राणघातक ठरलं आहे. या औषधाच्या सेवनामुळं पारसिया इथं 10 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. औषध उत्पादक कंपनी आणि सरकारी डॉक्टर असलेले आणि एका खासगी क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करणारे डॉ. प्रवीण सोनी यांच्याविरुद्ध पारसिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पोलीस पथकानं शनिवारी रात्री उशिरा छिंदवाडा येथील राजपाल चौकातून डॉ. प्रवीण सोनी यांना ताब्यात घेतलं.