गडचिरोली : पुष्पा सिनेमातील चंदन तस्करी करणाऱ्या अल्लू अर्जुनची स्टोरी सर्वांनीच बघितली आहे. कधी दुधाच्या टँकरमधून तर कधी नदी- नाल्याच्या पात्रातून सर्रासपाने वनविभाग आणि पोलिस विभागाच्या डोळ्यात धुळ फेकत केलेली चंदन तस्करी आणि त्या सिनेमात दाखवलेली नवी शक्कल प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. त्यामुळेच पुष्पा आणि पुष्पा-2 सिनेमाने चांगलीच कमाईही केली होती. आता गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात देखील अशीच शक्कल लढवून येथील मौल्यवान सागवान तेलंगाणा राज्यात तस्करी विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने वनविभागाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग हे मौल्यवान सागवानासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र, तेलंगाना आणि छत्तीसगड या तीन राज्यांची सीमा असलेल्या या वनविभागातील मौल्यवान सागवान जंगलावर परराज्याची विशेषतः तेलंगणा आणि छत्तीसगड राज्याची वक्रदृष्टी पडली आहे. त्यामुळे येथे मागील अनेक वर्षापासून सागवान तस्करी सुरूच आहे. बुधवारी (1 ऑक्टोबर) रोजी सिरोंचा तालुका मुख्यालय जवळील चिंतलपल्ली येथे वन विभागाने रात्रीच्या सुमारास एका चार चाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात सागवान लाकडे जप्त केली. नेमकी ती चारचाकी वाहनं कुणाची आहेत? मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी कुठे केली जात होती? चौकशीत काय निष्पन्न झाले? चार दिवस उलटूनही सिरोंचा वनविभागाने अजूनपर्यंत या कारवाईची माहिती प्रसार माध्यमांना का दिली नाही? दरम्यान, वन विभागाची कारवाई सुरु असली तरी या कारवाईवरून सिरोंचा तालुक्यात मौल्यवान सागवान लाकडांची तस्करी सुरूच असल्याचे पुन्हा एकदा निष्पन्न झाले आहे.
विशेष म्हणजे, झिंगानूर आणि आसरअली वन परीक्षेत्रात अशा अनेक घटना यापूर्वी देखील उघडकीस आल्या आहेत. तस्करांचा अनेकदा डाव फसला असला तरी आरोपी मोकाटच होते. त्यामुळे ‘पुष्पा’ अभी झुका नही हे स्पष्ट होत आहे. या घटनेची अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी येथील अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केले असता 1 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास सागवान तस्करी करणाऱ्या चारचाकी वाहनाला ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, चौकशी पूर्ण झाल्याशिवाय प्रसार माध्यमांना माहिती देऊ नका, असे वरिष्ठांचे स्पष्ट निर्देश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या परिसरातून सागवान तस्करी करणारे आरोपी यावेळी तरी वनविभागाच्या हाती लागतात की, नेहमीप्रमाणे केवळ चारचाकी वाहनासह मुद्देमालावरच वनविभागाला समाधानी राहावे लागणार? आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चारचाकी वाहनात कप्पे बनवून सागवान तस्करी
1 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास चिंतलपल्ली जवळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलेली चारचाकी वाहन आसरअलीकडून आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, त्या वाहनात लोखंडी पत्राचे कप्पे बनवून आतमध्ये मौल्यवान सागवान लाकूड लपवून ठेवले होते, तर कधी तुडुंब भरलेल्या नदीतून तराफे बनवून सागवानाची तस्करी केली जात आहे. तर कधी चारचाकी वाहनात कप्पे बनवून तस्करी केली जात आहे. सिरोंचा वनविभागातील मौल्यवान सागवान तस्करीसाठी सध्या पुष्पा स्टाईल चांगलाच प्रचलित होत आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो
सिरोंचा वनविभागात सिरोंचा, आसरअली, देचली, बामणी, जिमलगट्टा, झिंगानूर, कमलापूर आणि प्राणहिता असे एकूण आठ वनपरिक्षेत्र कार्यालय आहेत. यातील तालुका मुख्यालयातील वनपरिक्षेत्र कार्यालय सोडले तर इतर वनपरिक्षेत्र कार्यालयातील बरेच अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयात नसतात. त्यामुळे दुर्गम भागातील मौल्यवान सागवानाची सर्रासपणे तस्करी केली जात असल्याची चर्चा आहे.
उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार
सिरोंचा वनविभागात मागील अनेक वर्षापासून मौल्यवान सागवान तस्करीचे अनेक प्रकार उघडकीस आले असले तरी तस्कर मात्र अजूनही मोकाटच आहेत. त्यामुळेच वारंवार अशा घटना घडत आहेत. विशेष म्हणजे, या वनविभागातील काही कर्मचाऱ्यांचा तस्करांना आशीर्वाद असल्याची खमंग चर्चा आहे. त्यामुळे या सर्व घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी वनमंत्र्यांकडे करणार आहे, अशी माहिती जनकल्याण समजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष, संतोष ताटीकोंडावार यांनी दिली आहे.