मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा बेस्ट बसच्या अपघाताची घटना समोर आली आहे. दादर प्लाझा येथे टेम्पोने बेस्ट बसला धडक दिली असून यात एकाचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले आहे. रविवारी रात्री प्लाझा सिनेमा जवळ टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो चालकाने वरळी डेपोहून प्रतिक्षानगरला जाणाऱ्या बेस्ट बसला जोरदार धडक दिली. एवढंच नव्हे तर पुढे जाऊन या टेम्पोने १ टॅक्सी आणि कारलाही धडक दिली.
या टेम्पोची धडक इतकी जोरदार होती की, बेस्ट बसला बसलेल्या धडकेमुळे बसने पुढे बस स्टाॅपवर उभ्या असलेल्या प्रवाशांना धडक दिली. या अपघातात ४ जण जखमी झाले असून एका युवकाचा मृत्यू झाला. शाहबुद्दीन (वय ३७ ) असे मृत युवकाचे नाव आहे. तर जखमींमध्ये ३ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा :
नवी मुंबई हादरली, मुख्याधिपिकेने केलेल्या अपमानामुळे मानसिक तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या
अपघातात धडक बसलेली बेस्ट बस वरळी डेपोतून निघून प्रतीक्षा नगरला जात होती. दरम्यान, दादर परिसरामध्ये प्लाझा सिनेमाच्या समोरील बस स्टॉपवर हा अपघात घडला. टेम्पोची बेस्ट बससह टॅक्सी आणि कारलाही धडक बसल्यामुळे अनेक गाड्यांचे नुकसान झाले. हा अपघात इतका मोठा होता की, संपूर्ण बेस्ट बस ही पुढे ढकलली गेली. आणि त्याची धडक बस स्टॉपवर उभ्या प्रवाशांना बसली. अपघात रात्रीच्या वेळी झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, कारण तेव्हा जर रस्त्यावर जास्त लोक असते तर खूप मोठी दुर्घटना झाली असती.
या अपघातात एकाच मृत्यू झाला आहे तर जखमींवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी, गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेली ‘टेम्पो ट्रॅव्लर’ सध्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवण्यात आलेली आहे.