पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तणावग्रस्त वातावरण दिसून येत आहे. अशातच आता थेट पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे.
पुणे शहरात गुन्हे शाखा युनिट 3 मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर लॉ कॉलेजरोडवर ड्यूटी संपवून घरी जात असताना रात्री 1 च्या सुमारास कोयत्याने वार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. बाईक वरुन जाणाऱ्या दोघांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. कट मारल्याच्या वादात हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सह्याद्री हॉस्पीटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्यात पोलीसच सुरक्षित नसतील तर नागरिकांचं काय? असा प्रश्न पुणेकरांसमोर उभा आहे.
हे ही वाचा :नवी मुंबई हादरली, मुख्याधिपिकेने केलेल्या अपमानामुळे मानसिक तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार, लॉ कॉलेज परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली. हे पोलीस कर्मचारी गुन्हे शाखा युनिट-3 मध्ये कार्यरत असून अमोल काटकर असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते ड्यूटी संपवून घरी परतत असताना बाईकवर आलेल्या दोघांनी त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. हा हल्ला कट मारण्याच्या वादातून करण्यात आला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या संपूर्ण घटनेमुळे पुण्यातील नागरिकांच्या सुरक्षितेतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तर पोलिसांवर झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरच हल्ला झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय असा सवाल उपस्थित केला जातोय.