विशाखापट्टणम : ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. गुरुवारी विशाखापट्टणमच्या मैदानावर बांगलादेश महिला संघाविरुद्धचा सामना 10 विकेट्सनं जिंकून ऑस्ट्रेलियन महिला संघानं उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघानं बांगलादेशला 50 षटकांत 198 धावांवर रोखलं आणि प्रत्युत्तरात 24.5 षटकांत एकही विकेट न गमावता लक्ष्य गाठलं.
हीलीनं झळकावलं वादळी शतक : ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीनं भारताविरुद्धच्या मागील सामन्यात 84 चेंडूत शतक ठोकलं होतं. तर या सामन्यात तीनं अवघ्या 73 चेंडूत शतक ठोकलं, जे महिला विश्वचषक इतिहासातील दुसरं सर्वात जलद शतक आहे. ती 20 चौकारांच्या मदतीनं 77 चेंडूत 113 धावा करुन नाबाद राहिली. तर फोबी लिचफिल्डनं 72 चेंडूत 84 धावांचं योगदान दिलं. दोन्ही फलंदाजांनी अभेद्य 202 धावांची भागीदारी केली.
Australia breeze past Bangladesh to seal their semi-final spot at #CWC25 🔥#AUSvBAN 📝: https://t.co/hw1f4HktRX pic.twitter.com/N8x5UAxFJF
— ICC (@ICC) October 16, 2025
भारतीय संघासाठी समीकरण काय :
ऑस्ट्रेलिया संघानं आयसीसी महिला वनडे विश्वचषक 2025 च्या उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्कं केलं आहे, तर टीम इंडियासाठी पुढचा रस्ताही खूपच कठीण झाला आहे. भारतीय महिला संघ सध्या चार गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे, संघानं चार सामने खेळले आहेत, दोन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. परिणामी, स्पर्धेतील उर्वरित तीन सामने टीम इंडियासाठी महत्त्वाचे बनले आहेत. त्यांचा सामना इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशशी होणार आहे. सेमीफायनलमध्ये आरामदायी स्थान मिळवण्यासाठी टीम इंडियाला तिन्ही जिंकावे लागतील.
हे हि वाचा : T20I विश्वचषकासाठी 19 संघ निश्चत; एका स्थान बाकी
तीन संघ जवळपास बाहेर :
ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनलमध्ये स्थान मिळवल्यानं, उर्वरित तीन स्थानांसाठी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसह भारतही प्रबळ दावेदार असल्याचं दिसून येतं. इंग्लंड सध्या सात गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. कीवी महिला संघाकडे सध्या चार सामन्यांत फक्त तीन गुण आहेत, परंतु जर त्यांनी त्यांचे उर्वरित तीनही सामने जिंकले तर ते जवळजवळ सेमीफायनलमध्ये स्थान मिळवतील. याशिवाय, जर आपण पॉइंट टेबलमध्ये बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानी महिला संघाबद्दल बोललो तर, तिन्हीही सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडले आहेत.