“महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी हे केवळ प्रशासनाचे घटक नाहीत, तर शहर विकासाचे प्रेरक बिंदू आहेत. खेळातून संघभावना, शिस्त आणि उत्साह वाढतो; हेच गुण उत्तम नागरिकसेवेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे आरोग्य टिकवा, खेळत राहा आणि जनसेवेतील कार्य अधिक प्रभावी बनते. या उपक्रमांमधून महापालिका परिवारातील एकजूट, उत्साह आणि कार्यक्षमतेचे दर्शन घडले. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्यदायी शरीर, समर्पित मन आणि नागरिकसेवेची भावना हीच महानगरपालिकेची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.
महापालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात सांडभोर यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी सह आयुक्त मनोज लोणकर, उप आयुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, कार्यकारी अभियंता हरविंदर सिंग बन्सल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक स्पर्धांचे आयोजन
महापालिकेचा वर्धापन दिन ११ ऑक्टोबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रस्सीखेच, संगीतखुर्ची, पासिंग बॉल, धनुर्विद्या, रायफल शुटिंग, बुद्धिबळ, धावण्याच्या विविध स्पर्धा, गोळाफेक, लांबउडी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, क्रिकेट अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिला कर्मचाऱ्यांसाठी पाककला, रांगोळी आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धांनी या सोहळ्याला रंगत आणली.यावेळी विधानपरिषद सदस्य अमित गोरखे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वतः रस्सीखेच व संगीतखुर्ची या स्पर्धांमध्ये सहभागी होत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित केला.
या स्पर्धांमध्ये अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी महिला बॅडमिंटन स्पर्धेत द्वितीय क्रमांक, क्रीडा विभागाचे उप आयुक्त पंकज पाटील यांनी पुरुष लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक, समाजविकास विभागाच्या उप आयुक्त ममता शिंदे यांनी महिला गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक, तसेच कार्यकारी अभियंता हरविंदर सिंह बन्सल यांनी पुरुष बॅडमिंटनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. महिला क्रिकेट स्पर्धेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिला संघ विजयी ठरला, तर पुरुष क्रिकेट स्पर्धेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.