ॲडिलेड
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात विराट कोहली शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. अॅडिलेडमध्ये कोहलीनं चार चेंडूंचा सामना केला. पण, त्याला एकही धाव काढता आली नाही. झेवियर बार्टलेटनं त्याला एलबीडब्ल्यू बाद केले.
सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत असताना सलग दुसऱ्या सामन्यात धावा काढण्यात अपयशी ठरला आहे. कोहलीच्या वनडे कारकिर्दीत तो सलग दोन सामन्यांमध्ये शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत रोहित शर्मासह विराट कोहलीनं स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये बहुप्रतिक्षित असे पुनरागमन केलं. त्यामुळं क्रिकेटप्रेमींना विराटकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण, ही अपेक्षा फोल ठरली आहे.
वनडेमध्ये विराटची 51 शतकं
कोहली (वनडे सामन्यात 51 शतकं) आणि सचिनचा (कसोटीत 51 शतकं) एकाच फॉरमॅटमध्ये फलंदाजातर्फे सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम आहे. विराटनं आणखी एक शतक केल्यास त्याचे वनडे सामन्यातील 52 वे शतक असेल. त्यामुळं या फॉरमॅटमध्ये फलंदाज म्हणून सर्वाधिक शतकं ठोकणारा विराटचा विक्रम ठरेल.
कोहलीच्या खराब फॉर्मची क्रिकेटप्रेमींना चिंता
पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात आठ चेंडूंचा सामना करूनही विराट कोहली शून्य धावावर बाद झाला. त्या सामन्यात कोहलीनं मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर कूपर कॉनोलला त्याचा झेल दिला. या मालिकेपूर्वी, मार्च 2025 मध्ये कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दिसला होता. त्यावेळी दोन चेंडूंमध्ये फक्त एक धाव काढता आली होती. 2027 मध्ये वनडे विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर 36 वर्षीय विराट कोहलीची ढासळलेली कामगिरी पाहून क्रिकेटप्रेमींची चिंता वाढली आहे.