Ravikant Tupkar controversial statement : सध्या राज्यात शेतकरी कर्जमाफीसह सह अन्य मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते कच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या या महाएल्गार मोर्चात शेतकरी नेते रविकांत तुपकर देखील सहभागी झाले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना०९ एक खळबळजनक विधान केलं आहे. शेतकऱ्यांनो तुम्ही टोकचं पाऊल उचलू नका, आमदारांऐवजी दोन-चार मंत्र्यांना कापा असे विधान त्यांनी नागपूर येथील मोर्चात केले. तर आता लढाई रस्त्यावर होईल, असे म्हणत बच्चू कडू यांनी देखील सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे.
पुढे तुपकर म्हणाले, महाराष्ट्रातील आम्ही सर्व शेतकरी नेते एकत्र आहोत. ही अभूतपुर्व गोष्ट या ठिकाणी घडताना दिसत आहे. आम्ही वेगवेगळ्या भागात लढतो. पण शेतकऱ्यांची वज्रमुठ एका ठिकाणी आणण्याचे काम बच्चू कडू यांनी केले आहे. हा मोर्चा अशा ठिकाणी आणला आहे की समृद्धी महामार्ग बंद, हैदराबाद जबलपूर मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे सरकारचे नाक दाबल्याशिवाय सरकारचे तोंड उघडत नाही, असे विधान करत दोन्ही शेतकरी नेत्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
जसं बच्चूभाऊंनी सांगितलं की, दोन-चार आमदारांना कापा. तसं मी सांगतो की, दोन-चार मंत्र्यांना कापा, असे खळबळ उडवून देणारे विधान रविकांत तुपकर यांनी केले आहे. त्यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून आक्रमक पवित्रा घेत हे धक्कादायक विधान केले आहे.
रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांना लुटले म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाले, सरकारने आता शेतकऱ्यांजवळ येऊन शेतकऱ्यांची मागणी मान्य करावी. आम्ही भीक नव्हे तर आमचा हक्क मागायला आलो आहे. आम्ही आत्महत्या करून मरणार नाही, तर हक्क घेऊन मरणार आहोत, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. जातीचा मोर्चा निघाला की सरकार आंदोलनस्थळी चर्चेसाठी येते. मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला तर तुम्ही इथे का येऊ शकत नाहीत? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.
आज संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी राज्यभरातून आलेले हजारो शेतकरी नागपूरच्या वेशीवर दाखल झाले. नागपूर–हैदराबाद, जबलपूर महामार्ग तसेच समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांनी पूर्णतः ठप्प केला.
सरकारने उद्यापर्यंत संपूर्ण कर्जमुक्तीचा निर्णय घेतला नाही, तर नागपूरमध्ये रेल्वे रोको आंदोलन… pic.twitter.com/Pk7kKWqmph
— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) October 29, 2025
नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
या आंदोलनाला राजू शेट्टी, महादेव जानकर, अॅड माजी आमदार वामन चटप, विजय जावंधिया यांच्यासह अन्य शेतकरी नेते यावेळी मोर्चाला उपस्थिती होते. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापून टाकावे, असे वक्तव्य माजी मंत्री बच्चू कडू यांनी संग्रामपूर येथे सभेत केले होते. त्यानंतर आता त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत रविकांत तुपकर यांनी त्याच पद्धतीचे विधान केले आहे. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पण ज्यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर वरील विधान केले होते. त्यामुळे अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या.
बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या –
– अटीशर्तींशिवाय शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा
– नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.
– गाईच्या दुधाला ५० रुपये तर म्हशीच्या दुधाला ६५ रुपये भाव द्या.
– उसाला प्रती टन ४ हजार ३०० प्रमाणे एफआरपी द्या
– अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्यात यावी.
– कांद्यावरील निर्यात शुल्क कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा.
– शेतमालाला योग्य हमीभाव देण्यात यावा, यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.












