राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आघाडी तुटली तरी चालेल, पण विधानसभा निवडणुकीत गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदे यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही,” असे सुतोवाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि युवासेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी केले आहे. प्रणिती शिंदे आमच्यासाठी चिल्लर आहे अशा खालच्या शब्दात कोळी यांनी टीका केल्याने आता खासदार प्रणिती शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“विधानसभा निवडणुकीत गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेसोबत आम्ही युती करणार नाही. आघाडी तुटली तरी चालेल, पण त्यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही.” त्यांनी पुढे आरोप केला की, “उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाचा अवमान करणारी प्रणिती शिंदे महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यात अपयशी ठरल्या आहेत. विरोधकांशी हातमिळवणी करून आघाडीला मातीत आणि गाळात नेऊन ठेवले.” शरद कोळी हे आपल्या रांगड्या भाषेमुळे नेहमीच चर्चेत येतात. आता त्यांच्या या विधानाने पुन्हा एखादा सोलापूरात शिवसेना-काँग्रेस वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा – BMC Political Reservation : मुंबई महापालिका आरक्षण सोडत 11 नोव्हेंबर रोजी; इच्छुकांची धाकधूक वाढली
उद्धव साहेबांसमोर झोळी पसरली
शरद कोळी यांनी आपला संताप व्यक्त करत प्रणिती शिंदेंवर वैयक्तिक टीका केली. “उद्धव साहेबांसमोर मतासाठी झोळी पसरवून खासदार झालेल्या प्रणिती शिंदे आज मोठेपणा दाखवतात. पण शिवसेनेमुळे खासदार झाल्याचं भान त्यांना राहिलेलं नाही.” कोळी यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रणिती शिंदेंना सांगितलं होतं, “शिवसेनेमुळे तुम्ही खासदार झाला आहात; आघाडीचा धर्म पाळा.” पण प्रणिती शिंदे यांनी तो आदेश पाळला नाही, त्यामुळे त्या “आमच्यासाठी चिल्लर आहेत”, असं कोळी म्हणाले.
आघाडी चालेल, पण नेतृत्व नाही
शरद कोळी यांनी स्पष्ट केलं की ठाकरे गटाला काँग्रेससोबत आघाडी करण्यात हरकत नाही, पण प्रणिती शिंदेंचं नेतृत्व कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे सोलापूर काँग्रेस आणि ठाकरे गटातील तणाव वाढण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. प्रणिती शिंदे यांना आमची शिवसेना संपवायला खासदार केलंय का? हे अजिबात आम्ही खपवून घेणार नाही. लोकसभेला मला खासदार करा, खासदार करा म्हणून उद्धवसाहेबांचं दहा वेळेस पाय धरायचं काम त्यांनी केलं.
पक्षात राहून गद्दारी करणार्यांना पहिल्यांदा पायतणाने हाणलं पाहिजे
शिवसेनेतले काही लोक पद शिवसेनेचे घेऊन काम काँग्रेसचे करत आहेत. वरिष्ठ लोकांच्या लक्षात ही गोष्ट आलेली आहे त्यामुळे पक्ष त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. मी आता कोणाचं नाव घेणार नाही, पण ते वेळेत सावध नाही झाले तर मला पत्रकार परिषद घेऊन या दोघांची नाव जाहीर करून घरचा रस्ता दाखवावा लागलं. मी या संदर्भातील सर्व पुरावे पक्षाला देणार आहे. विरोधकांपेक्षा आमच्यासोबत राहून पक्षासोबत गद्दारी करणार्यांना पहिल्यांदा पायतणाने हाणलं पाहिजे, असा स्वपक्षातील स्थानिक नेत्यांवर देखील शरद कोळी यांनी हल्ला चढवला.






