B 28 Bullet Trains : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी बंगळूरु येथील बीईएमएलच्या तिप्पसंद्र कॅम्पसला भेट दिली. याप्रसंगी, मंत्र्यांनी ‘आदित्य’ नावाच्या एका विशेष संकुलाचं उद्घाटन केलं, जिथं बुलेट ट्रेनची निर्मिती केली जाईल. अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, बुलेट ट्रेनचं तंत्रज्ञान गुंतागुंतीचं आणि क्लिष्ट आहे. ते म्हणाले की, आपल्या देशात बुलेट ट्रेनचा विकास हा स्वदेशी अभियांत्रिकीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांनी पुढं सांगितलं की, आयसीएफ आणि बीईएमएल संयुक्तपणे ‘आदित्य’ संकुलात बुलेट ट्रेनची ‘आत्मनिर्भर’ आवृत्ती, बी-28, डिझाइन करत आहेत.
हेही वाचा : राजकीय भूकंप! रात्री २ वाजता ठाकरे-फडणवीस भेट, ‘प्रबुद्ध भारत’चा दावा
चेन्नई आणि बंगळूरु दरम्यानचा प्रवास 73 मिनिटांत होईल पूर्ण :
बुलेट ट्रेनच्या परिवर्तनीय शक्तीवर प्रकाश टाकत रेल्वेमंत्री म्हणाले की, या गाड्यांच्या आगमनानं प्रमुख शहरं एकमेकांचाच एक भाग म्हणून दिसतील. त्यांनी चेन्नई आणि बंगळूरु दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेचं उदाहरण दिले, जो आता फक्त 73 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे; यामुळं ही दोन्ही शहरं प्रभावीपणे एकाच एकात्मिक केंद्राचा भाग बनतील. अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, मुंबई आणि बंगळूरु दरम्यान बुलेट ट्रेन सेवा सुरू झाल्यानं कनेक्टिव्हिटीमध्ये आणखी सुधारणा होईल. हुबळीमार्गे एलएचबी (LHB) डब्यांसह एक नवीन मेल एक्सप्रेस सुरु केली जाईल आणि वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसची सेवाही लवकरच सुरू होईल.
मंगळूरु आणि बंगळूरु दरम्यान वंदे भारत ट्रेन लवकरच :
मंत्र्यांनी पुष्टी केली की मंगळूरु आणि बंगळूरु दरम्यान वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू केली जाईल. त्यांनी यावर जोर दिला की, मडगाव आणि कर्नाटकातील इतर किनारपट्टीच्या शहरांना जोडण्यासह या ट्रेनच्या नियोजनाचा अंमलबजावणीपूर्वी पूर्णपणे विचार करण्यात आला होता. तांत्रिक अडथळे दूर करण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, रोलिंग स्टॉकच्या (ट्रेनचे डबे) पुढील पिढीवर त्यांचं काम “विकसित भारताचे” स्वप्न साकार करण्यात मध्यवर्ती भूमिका बजावते. त्यांनी मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधांचा विकास आणि पर्यावरणीय शाश्वतता व जनजागृती यांच्यात संतुलन राखण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.





