नवी दिल्ली Raghav Chadha Join BJP : राघव चढ्ढा यांच्यासह सात राज्यसभेच्या खासदारांना आम आदमी पार्टी (AAP) सोडून भारतीय जनता पक्षात (BJP) सामील होण्याला राज्यसभेच्या अध्यक्षांची मान्यता देण्यात आली आहे. या बदलानंतर आता राज्यसभेत भाजपाची संख्या 106 वरुन 113 झाली आहे, तर आम आदमी पक्षाच्या खासदारांची संख्या 10 वरुन 3 वर आली आहे. विशेष म्हणजे राघव चढ्ढा यांनी नुकतीच घोषणा केली होती की, त्यांच्यासह अन्य 6 आप खासदारही पक्ष सोडून भाजपामध्ये सामील होत आहेत. यानंतर भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांनी या खासदारांचं मिठाई भरवून स्वागत केलं होतं.
हेही वाचा : “ट्रम्प यांच्यावर गोळीबार हा त्यांच्या कृतींचा परिणाम, भारतातील लोकांनाही असंच
राघव चढ्ढा यांच्यासह 7 खासदार भाजपात :
दोन दिवसांपूर्वीच बंडखोरी करुन भाजपामध्ये सामील झालेल्या आम आदमी पक्षाच्या (आप) खासदारांमध्ये राघव चढ्ढा, स्वाती मालीवाल, अशोक कुमार मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, राजिंदर गुप्ता आणि विक्रमजीत सिंग साहनी यांचा समावेश आहे. या सर्वांच्या समावेशानंतर राज्यसभेतील भाजपाची संख्या आणि प्रभाव दोन्ही वाढलं आहे. आता राज्यसभेत आम आदमी पक्षाचे फक्त तीन खासदार उरले आहेत, त्यात संजय सिंग (राज्यसभेतील पक्षनेते), नारायण दास गुप्ता आणि संत बलबीर सिंग यांचा समावेश आहे. या विलीनीकरणानंतर ‘आप’ची स्थिती कमकुवत झाली असून, भाजपाला आता राज्यसभेत आपली रणनीती अधिक मजबूतपणे राबवता येणार आहे.
‘आप’मध्ये फूट आणखी वाढणार? :
नुकत्याच झालेल्या राज्यसभा खासदारांचे भाजपमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर ‘आप’मध्ये फूट पडल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या सभापतींनी ‘आप’च्या सात खासदारांना भाजपामध्ये सामील करुन घेण्यास मान्यता दिल्यानं भाजपाला राजकीय फायदा झाला आहे, तर आम आदमी पक्षातही असंतोष आणि गटबाजीच्या अफवा पसरत आहेत.
राघव चढ्ढांविरोधात निदर्शनं :
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील अनेक बडे नेते राघव चढ्ढा यांच्या संपर्कात असून ते पक्ष सोडण्यास इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु आपचे खासदार संजय सिंह यांनी या सर्व अफवा असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, भाजपा आणि राघव चढ्ढा यांच्या विरोधात या अफवा जाणूनबुजून पसरवल्या जात आहेत. चड्ढा आणि इतर राज्यसभा खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर, ‘विश्वासघात’ केल्याबद्दल त्यांच्याविरोधात संपूर्ण पंजाबमध्ये निदर्शनं केली जात आहेत.






