जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे अवैधपणे बायोडिझेलची वाहतूक करणाऱ्या दोन टँकरवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करून त्यांना जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी, १८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजता करण्यात आली. या प्रकरणी दोन ट्रँकर चालक आणि त्यांच्या मालकांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनगे यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्तीवर असताना संशयास्पदरीत्या जाणाऱ्या दोन टँकरांना थांबवण्यात आले. चौकशीत चालकांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांनी तपास केला असता, टँकरमध्ये मोठ्या प्रमाणावर बायोडिझेल आढळले. टँकर क्रमांक (जीजे १२ बीटी ११८१), टँकर क्रमांक (जेजे १२ बीटी ४२८४) ही दोन्ही टँकर जप्त केले आहे. दोन्ही टँकरमध्ये मिळून एकूण २७ लाख रुपये किमतीचे बायोडिझेल सापडले. यानंतर पोलिसांनी वाहनचालक सद्दाम सय्यद अकबर (२३, रा. बच्छाव, गुजरात) आणि लतीफ भाई फकीर मोहम्मद हिंगोरजा (२४, रा. आडेचार, कच्छ, गुजरात) यांच्यासह टँकर मालक ज्ञानेश्वर भारत शेजोळे (२१, रा. उकडी, ता. बुलढाणा) आणि सुलेमान इलियास छेरेया (रा. वरसाना, कच्छ, गुजरात) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि चंद्रकांत धनगे करीत आहेत.












