राष्ट्रवादी शरद पवार गटाचे परभणी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ७ ऑगस्ट रोजी मुंबईत टिळक भवनामध्ये त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम होणार असून, यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थिती असणार आहेत. समर्थकांनी सोशल मीडियावर बॅनर्सही व्हायरल केले आहेत. याआधी अजित पवार गटात जाणार अशीही चर्चा होती, मात्र ती रखडली. दरम्यान, काँग्रेसमधून बाहेर पडण्याचं सत्र थांबून, आता ‘इनकमिंग’ सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मराठवाड्यात काँग्रेस बळकट करण्याच्या हालचालींना गती मिळाली असून, दुर्राणी यांच्या प्रवेशामुळे शरद पवार गटाला राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे.