‘बिग बॉस 19’ काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, यंदाच्या सिझनमध्ये मराठी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेने एन्ट्री घेतली आहे. महाराष्ट्रभर आपल्या विनोदी शैलीने गाजलेला प्रणित यापूर्वीही चर्चेत होता – विशेषतः वीर पहाडियाची मस्करी केल्याने झालेल्या वादामुळे.
गेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने प्रणितची चांगलीच शाळा घेतली होती. कारण, प्रणितने याआधी सलमानवर अनेक मजेशीर जोक्स केले होते. मात्र याच पार्श्वभूमीवर प्रणितने एक धमाकेदार परफॉर्मन्स सादर करत आपलं टॅलेंट पुन्हा सिद्ध केलं आहे.
‘द बिबी शो’ नावाच्या टास्कमध्ये घरातील सदस्यांना त्यांचं टॅलेंट सादर करण्याची संधी मिळाली. आवेज दरबारने आपल्या जबरदस्त डान्सने प्रेक्षकांची मने जिंकली, तर अमाल मलिकने ऑन-द-स्पॉट गाणं कंपोज करत सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. यानंतर मंचावर आला प्रणित मोरे – आणि त्याने आपल्या कॉमिक पंचेसने वातावरण पूर्णपणे हलकं-फुलकं केलं.
प्रणितने घरातील प्रत्येक सदस्यांवर विनोदी टिप्पणी केली – फारहाना, कुनिका, तान्या अशा अनेक स्पर्धकांची मजेशीर मस्करी करत त्याने कोणाच्याही भावना न दुखावता प्रेक्षकांचं मन जिंकलं. सदस्यही हसून हसून लोटपोट झाले.
प्रणितचा हा कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, कमेंट्समध्ये त्याला जोरदार पाठिंबा मिळतो आहे. “प्रणित खरा कॉमेडियन आहे,” अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. त्याच्या अचूक निरीक्षण आणि सहज विनोदशैलीमुळे तो प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
दुर्गा चव्हाण (लेखिका)