देशभरात केंद्र सरकारने घेतलेल्या GST (वस्तू आणि सेवा कर) संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अनेक वस्तू स्वस्त झाल्या असल्या, तरी स्मार्टफोन आणि लॅपटॉप खरेदीदारांच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे. केंद्र सरकारने 12% GST स्लॅब रद्द करत त्याऐवजी अनेक वस्तूंवरील GST थेट 5 टक्क्यांवर आणला आहे. यामध्ये रोजच्या जीवनातील पनीर, ब्रेड, पिझ्झा, आईस्क्रीम, सुकामेवा यांसारख्या खाद्यपदार्थांपासून ते टीव्ही, एसी, वॉशिंग मशीनसारख्या घरगुती वस्तूंचा समावेश आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या हातातील मोबाईल आणि लॅपटॉपच्या बाबतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
स्मार्टफोनवरील GST ‘जैसे थे’
मोबाईल हे आजच्या काळात प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यावश्यक घटक झाले आहेत. अगदी सामान्य कुटुंबांपासून ते उच्चभ्रू घरांपर्यंत सर्वत्र स्मार्टफोनचा वापर होतो. मात्र, अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील GST कपातीनंतरही मोबाईल फोनवर 18% GST कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे Apple, Samsung, Xiaomi, Redmi, OnePlus, Oppo यांसारख्या कंपन्यांचे फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कोणतीही करसवलत मिळणार नाही.
लॅपटॉप खरेदीदारांनाही दिलासा नाही
मोबाईलप्रमाणेच लॅपटॉप हे देखील आधुनिक युगातील गरजेचे साधन झाले आहे. वैयक्तिक वापर, व्यवसाय, शिक्षण आणि वर्क फ्रॉम होमच्या गरजांमुळे लॅपटॉपची मागणी वाढली आहे. विद्यार्थ्यांपासून ते आयटी कंपन्यांपर्यंत सर्वत्र याचा वापर होतो. मात्र, GST स्लॅबमध्ये बदल करूनही लॅपटॉपवर 18 टक्क्याच दराने कर आकारला जात असल्याने खरेदीदारांमध्ये नाराजी आहे.
GST चा थेट फायदा नाही, पण ऑफर्समुळे दिलासा?
जरी मोबाईल आणि लॅपटॉपवरील GST दर अपरिवर्तित आहेत, तरीही ग्राहकांसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑफर्सचा पाऊस पडणार आहे. 23 सप्टेंबरपासून Amazon Great Indian Festival आणि Flipkart Big Billion Days सारख्या मोठ्या सेल्सना सुरुवात होत आहे. त्यामुळे GST कपात नसली तरी, या सेल्समधील भारी सूट व नो-कॉस्ट EMI सारख्या ऑफर्समुळे काही प्रमाणात खरेदीदारांना दिलासा मिळू शकतो