भारताच्या क्रिकेट इतिहासातील विश्वासार्ह दिग्गज फलंदाज क्रिकेटरनी आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. अद्भुत कसोटी कारकिर्दी गाजवलेल्या दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा यांनी भारतीय किक्रेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली. ट्विटरवर भावनिक पोस्ट करत त्यांनी क्रिकेट विश्वाला निरोप दिला. ऑस्ट्रेलियामध्ये २०१८ मध्ये मिळालेला मालिका विजय त्यांची ओळख आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय टीमचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात धाडसी खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती.
चिंटू या टोपण नावानं ओळखला जाणारा ३ वर्षांचा मुलगा. भारतातल्या बहुतेक मुलांना मिळते, तशी त्यालाही खेळण्यातली बॅट मिळायची, या बॅटने तो खेळायचा तेव्हा त्याची नजर कायम बॉलवर खिळलेली असायची, त्याच्या वडिलांनी ही गोष्ट हेरली आणि त्याला क्रिकेटचा नाद लावला, जुन्या गादीपासून चिंटूच्या आईनं बॅटिंग पॅड्स बनवले आणि ३ कोठी ग्राऊंडवर लिंबाच्या झाडाजवळ चिंटू प्रॅक्टिस करायला लागला, आता प्रॅक्टिस म्हणजे काय होतं तर तो रोज एक हजार बॉल खेळायचा. करायची आहे म्हणून दोन तास प्रॅक्टिस केली आणि गेला, असा कारभार नाहीच, तो हजार बॉल हमखास खेळायचा.
त्याच्या या सवयीचा त्याला पुढे जाऊन मोठा फायदा झाला, कारण त्याच्या टेस्ट करिअरमध्ये त्यानं बॉल खेळले १६ हजार २१७. तोच चिंटू ओळखला गेला चेतेश्वर पुजारा म्हणून. दिवसाचे हजार बॉल खेळणाऱ्या पुजारानं गॅबावर अंगावर जखमा झेलल्या, कित्येक तास पिचवर टिच्चून उभा राहिला, टीममध्ये नंबर ३ चं स्थान लॉक केलं. पुजाराचे भक्कम तंत्र आणि संयम टीम इंडियावर येणाऱ्या दबावासाठी आधारस्तंभ ठरले. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून पुजाराने 103 कसोटीमध्ये 7195 धावा करून 19 शतके आणि 35 अर्धशतके केले. चेतेश्वर पुजाराने 16217 चेंडूचा सामना खेळला.
चेतेश्वर पुजाराने ट्विटरवर पोस्टमध्ये “भारतीय जर्सी घालणे, राष्ट्रगीत गाणे आणि मैदानावर पाऊल ठेवताना प्रत्येक वेळी सर्वोत्तम प्रयत्न करणे – याचा खरा अर्थ काय आहे हे शब्दात सांगणे अशक्य आहे. पण जसे सगळे म्हणतात, सुरु होणारा प्रवास कधीतरी संपतो आणि अपार कृतज्ञतेने मी सर्व प्रकारच्या भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी लिहिले.
अनेक तरुण क्रिकेटर येतील पण पुजारासारखी चलाख आणि संयमी फलंदाज पुन्हा भारताच्या इतिहासात घडणे नाही.. चेतेश्वर पुजाऱ्याच्या अद्भुत कसोटी कारकिर्दीबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…
-प्रीती हिंगणे ( लेखिका )