सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव मंडळात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, हळद यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांच्या शेतातील शेती उपयोगी साहित्य वाहून गेल्याने प्रचंड हानी झाली आहे. तसेच नदीपात्रात पाणी न मावल्यामुळे नदीकाठावरील शेतात पाणी शिरून जमिनीही खरडून गेल्या आहेत. त्यामुळे शासनाने प्रत्यक्ष बांधावर येऊन पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.