इंदोर
आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात सुरु आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी इंदोरमध्ये सामना खेळवण्यात आला. यासाठी दोन्ही संघ इंदोरला आले होते. दोन्ही संघ एका हॉटेलमध्ये राहत होते. मात्र शुक्रवारी हॉटेलमधून बाहेर पडताना एमआयजी पोलीस स्टेशन परिसरात दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्रास देण्यात आला. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करत त्याची चौकशी सुरु केली आहे.
महिला खेळाडूंची चालता-चालता काढली छेड
इंदोरमध्ये आयसीसी महिला विश्वचषक सामना होणार आहे आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सहभागी होण्यासाठी इंदोरमध्ये होता. शुक्रवारी, दोन ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू त्यांच्या हॉटेलमधून एका कॅफेकडे चालत जात होत्या. खजराना रोडवरुन चालत असताना, दुचाकीवरुन आलेल्या एका तरुणानं त्यांच्याकडे येऊन त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. महिला खेळाडूंनी ताबडतोब त्यांचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिम्स यांना संदेश पाठवून घटनेची माहिती दिली.
खेळाडूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न
महिला खेळाडूंनी तक्रार केली की एक तरुण त्यांना त्रास देत आहे आणि वारंवार स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहे. सुरक्षा अधिकाऱ्याला लाईव्ह लोकेशन पाठवताच, डॅनी सिम्स यांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला. एका कारचालकानं येऊन दोन्ही महिला खेळाडूंशी चर्चा केली आणि घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली.
नराधमाची चौकशी सुरु
महिला खेळाडूंचे सुरक्षा अधिकारी डॅनी सिम्स यांनी एमआयजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि त्याचा शोध सुरु केला. जवळच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी खजराणा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या अकिल नावाच्या तरुणाला अटक केली. अकिलची चौकशी सुरु आहे.





