नवी दिल्ली : प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब आता एका मोठ्या क्रिप्टो फसवणुकीच्या प्रकरणात सामील झाला आहे. बुधवारी उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील पोलीस पथकानं त्याच्या दिल्लीतील घरावर छापा टाकला तेव्हा तो उपस्थित नव्हता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हबीब सध्या चौकशीला टाळाटाळ करत आहे आणि सध्या फरार आहे. पोलिसांनी त्याला लवकरच हजर राहण्याचे आणि तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.
कोट्यवधी रुपयांची फसवणूक, 32 एफआयआर दाखल : वृत्तानुसार, हबीबवर अंदाजे ₹5 ते ₹7 कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्याचा आरोप आहे. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध 32 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात त्याचा मुलगा अनस आणि एक भागीदार सैफुल यांचंही नाव आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की या व्यक्तींनी जास्त परतावा देण्याचं आश्वासन देऊन लोकांकडून पैसे घेतले, परंतु गुंतवणूकदारांना निर्धारित वेळेनंतरही त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत.
जावेद हबीबचा फसवणुकीचा खटला काय : पोलिसांच्या माहितीनुसार, हबीब आणि त्याच्या सहकाऱ्यांनी फॉलिकल ग्लोबल कंपनी (FLC) नावाच्या फसव्या योजनेद्वारे लोकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं. या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदारांना ₹5 लाख ते ₹7 लाखांपर्यंत शुल्क आकारलं जात होतं आणि बिटकॉइन आणि बायनान्स कॉइनमध्ये 50% ते 70% परतावा देण्याचं आश्वासन दिलं जात होतं.
#WATCH संभल, उत्तर प्रदेश: हेयर स्टाइलिस्ट जावेद हबीब के आवास पर पुलिस की छापेमारी पर SP केके विश्नोई ने कहा, “कुछ दिन पहले कुछ लोगों ने सूचना दी थी कि उनके साथ बड़े लेवल पर एक फ्रॉड हुआ है। जांच में पाया गया जावेद हबीब, उनके बेटे और सैफुल्लाह नामक 3 लोगों का नाम सामने आया। पुलिस… pic.twitter.com/XZBj19BPrp
— ANI_HindiNews (@AHindinews) October 15, 2025
पोलिसांची कारवाई, लूकआउट नोटीस जारी :
संभळ पोलिसांनी एकूण 5 ते 7 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं वृत्त दिलं. परिणामी, जावेद हबीब, त्यांचा मुलगा आणि कुटुंबियांना देशाबाहेर पळून जाण्यापासून रोखण्यासाठी लूकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. संभलच्या राया सत्ती पोलीस स्टेशनचे प्रभारी गोविंद कुमार म्हणाले, “आतापर्यंत 32 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. हबीब, त्याचा मुलगा आणि एका सहकाऱ्याला चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. रविवारी, हबीबचे वकील आम्हाला भेटले आणि आम्हाला कळवलं की त्यांचा क्लायंट आजारी आहे. त्यांना हृदयविकाराचा त्रास आहे आणि अलीकडेच त्यांचे वडील वारले आहेत.” वकील पवन कुमार म्हणाले, “आम्ही पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत, परंतु हबीब सध्या आजारी आहे.”
हे हि वाचा : इंदोरमध्ये अनेक तृतीयपंथी लोकांचा एकत्र फिनाइल पित आत्महत्येचा प्रयत्न; परिसरात खळबळ
पुढं काय होणार? :
पोलिसांचं म्हणणं आहे की सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे आणि आणखी नावं समोर येऊ शकतात. जावेद हबीब हे देशातील एक प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट आणि सेलिब्रिटी आयकॉन असल्यानं या संपूर्ण प्रकरणानं सोशल मीडियावरही खळबळ उडवून दिली आहे. जर आरोप सिद्ध झाले तर हे भारतातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या क्रिप्टो गुंतवणूक फसवणुकींपैकी एक असू शकते.