रायगडच्या कर्जतमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जत पोलिस ठाण्यातच दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांना बेदम मारहाण केली आणि धारदार शस्त्रांचा वापर करत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना पोलिस ठाण्यात घडली असून पोलिसांच्या समोरच दोन्ही गट मारामारी करत राहिले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्जत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
कसा झाला हा प्रकार मंगळवारी कर्जतमध्ये दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. विशेष म्हणजे ही हाणामारी थेट कर्जत पोलिस ठाण्यात घडली. या हाणामारीत कोयत्यांचा वापर करण्यात आला. हल्लेखोरांनी तीन तरुणांवर कोयत्याने सपासप वार केले, त्यामुळे हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस ठाण्यातच कोयता हल्ला – कायद्याचा धाक उरला नाही या घटनेनंतर कर्जतमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस ठाण्यातच कोयत्याने हल्ला करण्यात आल्यामुळे कायद्याचा धाक गुन्हेगारांवर राहिलेला नाही, असे चित्र दिसत आहे. यामध्ये महिलांचाही समावेश होता, त्यामुळे हा प्रकार अधिकच गंभीर बनला आहे. हे प्रकरण दोन कुटुंबांमधील वादामुळे घडले.












