सांगली : गेल्या काही दिवसापासून आत्महत्येच्या घटना सतत वाढताना दिसत आहे. सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास, हुंड्यासाठी होणारा छळ अशा अनेक घटना ऐकायला मिळतात. अशीच एक घटना समोर आली आहे. सांगली इस्लामपूर शहरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे अंबाबाई मंदिर परिसरात रहिवासी असलेल्या 25 वर्षीय नवविवाहित अमृता गुरव हिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. या नवविवाहित महिलेला माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावण्यात आला होता. या त्रासाला कंटाळून तिने तिचे आयुष्य संपवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नवविवाहित महिलेच्या सासूला कर्करोग झाल्यामुळे नवविवाहितेला माहेरून 2 लाख रुपये आणण्यासाठी छळ करण्यात येत होता.
काय आहे घटना
मृत अमृता या नवविवाहितेच्या सासूला कर्करोग झाल्यामुळे तिच्या उपचारासाठी पैसे हवे होते. परंतु पैश्यांचे नियोजन होत नसल्याने त्यांनी नवविवाहितेला माहेरून पैसे आणण्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. सासू, नणंद, पती, पतीचा मामा, सासरे या सर्वांनी तिला शिवीगाळ करत पैस्यांसाठी तिच्यावर दबाव टाकल्यात आल्याचे तिच्या आईने सांगितले. रोजच्या या छळाला कंटाळून तिने विष प्राशन करून जीव दिला. अमृता हिचा 1 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. या प्रकरणी मृत अमृताच्या आई वंदना अनिल कोले यांनी इस्लामपूर पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे.
फिर्यादीनुसार मृत अमृताचे पती ऋषीकेश गुरव, यांच्यासह सासू, सासरे, नणंद ऋतुजा आणि पतीचा मामा या पाचजणांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या संपूर्ण घटनेने इस्लामपूर येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.