छत्रपती संभाजीनगर : सध्या छत्रपती संभाजीनगर येथे प्रचंड गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. या घटना कमी होण्याचे नाव घेत नसून या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. अशातच छत्रपती संभाजीनगर येथे एका व्यक्तीचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोड वरील सेंट फ्रान्सिस स्कूलच्या मैदानावर बुधवारी म्हणजे 14 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव सुरेश भगवान उंबरकर असून त्याचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. तर त्याच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याचेही आढळून आले आहे.
हे ही वाचा : पुण्यात गुन्हेगारी वाढली; गाव गुंडानी केली वाहनांची तोडफोड
सेंट फ्रान्सिस स्कूल समोरील दुकानदारांनी मैदानाच्या मागील बाजूस या तरुणाचा मृतदेह पहिला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवून या घटनेची माहिती दिली. संपूर्ण माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक लॅबचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता.
मृत सुरेश उंबरकर हा जाफराबाद (जि. जालना) येथील रहिवासी असून, छत्रपती संभाजीनगरमधील भानुदासनगर भागात कुक म्हणून काम करत होता.या घटनेची माहिती मिळताच उंबरकर यांचे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हृदयद्रावक आक्रोश केला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून, खुनामागचे नेमके कारण अद्याप कळालेलं नाही.