पुण्यात पोलीस कर्मचारीच सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पोलिसाला चार मद्यपींनी रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर, रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात घडला. मारहाण करणाऱ्या मद्यपींनी संबंधित पोलिसाचा मोबाईलही हिसकावला. या घटनेनंतर पोलिसाने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे.
ही घटना घडल्यानंतर त्वरित कारवाई करण्यात न आल्याने, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर चतुःश्रृंगी पोलिसांनी तब्बल तीन दिवसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी चंद्रकांत जाधव (वय ४२, रा. रामोशीवाडी) यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी रुपेश मांजरेकर, अनिकेत घोडके आणि अभिजित डोंगरे या तिघांना अटक केली आहे. तसेच त्यांच्या आणखी एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला प्रकार पोलिस कर्मचारी चंद्रकांत जाधव यांना मारहाण करण्यात आल्याचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत जाधव हे सहकारनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत आणि रामोशीवाडी, एस.बी. रोड परिसरात वास्तव्यास आहेत. गुरुवारी (दि. १३) मध्यरात्री ते आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोम्बिंग ऑपरेशन पूर्ण करून घरी परत निघाले होते.











