संस्कृती

नवरात्रीचा इतिहास, विज्ञान आणि नऊ रंगांचं महत्त्व जाणून घ्या!

Navratri History
112

Navratri History : ब्रह्मांडाच्या गर्भातून जेव्हा काहीच नव्हतं, तेव्हा केवळ एक ऊर्जा अस्तित्वात होती, आदिपराशक्ती. याच आदिमायेच्या, म्हणजेच स्त्री शक्तीच्या जागरणाचा उत्सव म्हणजे नवरात्र. नऊ रात्री आणि दहा दिवसांचा हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर तो निसर्ग, विज्ञान, मानवी भावना, इतिहास आणि संस्कृतीचा एक अप्रतिम मिलाफ आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात येणारी ही नवरात्र नेमकी सुरू कशी झाली? यामागे कोणती शौर्यगाथा लपली आहे? ऋतुबदलाशी याचा काय संबंध आहे? आणि दरवर्षी नऊ रंगांची जी उधळण होते, त्यामागचं गुपित काय?

नवरात्रीची सुरुवात आणि पौराणिक इतिहास ( Navratri History )

नवरात्रीच्या निर्मितीची कथा समजून घेण्यासाठी आपल्याला हजारो वर्षं मागे, पुराणांच्या पानात जावं लागेल. यात दोन मुख्य कथांचा संदर्भ येतो, ज्या असत्यावर सत्याच्या आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाची साक्ष देतात. पहिली आणि सर्वात लोकप्रिय कथा आहे महिषासूर मर्दिनीची. महिषासूर नावाचा क्रूर राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं होतं की, जगातला कोणताही पुरुष, देव, मानव किंवा प्राणी त्याचा वध करू शकणार नाही. या वरदानाच्या अहंकारात त्याने तिन्ही लोकांत हाहाकार माजवला. देवांचे राजे इंद्रदेवही त्याच्यासमोर हतबल झाले. शेवटी, सृष्टीचं रक्षण करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवानी आपल्या शरीरातील ऊर्जेचं एकत्रीकरण केलं. या अथांग ऊर्जेतून एक दिव्य, तेजस्वी आणि अष्टभुजाधारी शक्ती प्रकट झाली, तीच म्हणजे माता दुर्गा. देवी दुर्गेला सर्व देवांनी आपली अस्त्र-शस्त्र बहाल केली. हिमालयाने तिला सिंह हे वाहन दिलं. जेव्हा ही आदिशक्ती रणांगणात उतरली, तेव्हा तिने नऊ दिवस आणि नऊ रात्री महिषासुराच्या अफाट सैन्याशी आणि स्वतः महिषासुराश लढाई केली. हा लढा एवढा भयानक होता की संपूर्ण ब्रह्मांड थरथरत होतं. प्रत्येक दिवशी देवीने नवीन रूप धारण करून राक्षसांचे मनसुबे उधळून लावले. शेवटी, दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला आणि सृष्टीला त्याच्या जाचातून मुक्त केलं. म्हणूनच या नऊ रात्रींना नवरात्र आणि दहाव्या दिवसाला विजयादशमी म्हणजेच दसरा असं नाव मिळालं.

दुसरी कथा प्रभू श्रीरामांशी जोडलेली आहे, जिला आपण अकाल बोधन म्हणतो. रामायणातील कथेनुसार, प्रभू श्रीरामांना रावणाचा वध करायचा होता, जो स्वतः महापराक्रमी आणि शिवभक्त होता. रावणावर विजय मिळवण्यासाठी शक्तीची आवश्यकता होती. सामान्यतः वसंत ऋतूमध्ये नवरात्र साजरी केली जायची, ज्याला आपण चैत्र नवरात्र म्हणतो. पण श्रीरामांनी रावणाचा वध करण्यासाठी अश्विन महिन्यात, म्हणजेच शरद ऋतूमध्ये देवी दुर्गेचं आवाहन केलं. त्यांनी नऊ दिवस कठोर उपवास करून देवीची पूजा केली. पूजेच्या वेळी त्यांनी देवीला १०८ नीलकमळ वाहण्याचा संकल्प केला होता. पण देवीने त्यांची परीक्षा घेण्यासाठी एक कमळ लपवून ठेवलं. संकल्प पूर्ण करण्यासाठी श्रीरामांनी स्वतःचा एक डोळा देवीला अर्पण करायचा निर्णय घेतला. त्यांच्या या परम भक्तीवर प्रसन्न होऊन देवी दुर्गेने त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला. यानंतर लंकेत जाऊन प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला. हा दिवसही विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच, ऐतिहासिक आणि पौराणिक दृष्ट्या हा उत्सव अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध पुकारलेला एल्गार आहे.

हेही वाचा : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी! नऊ दिवस देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

घटस्थापनेचे महत्त्व आणि त्यामागील परंपरा ( Ghatasthapana )

या उत्सवाचं सर्वात महत्त्वाचं प्रतीक म्हणजे घटस्थापना ( Ghatasthapana ). एका मातीच्या पात्रात काळी आई, म्हणजेच शेतातील सुपीक माती पसरवली जाते. त्या मातीमध्ये गहू, जव, ज्वारी, बाजरी, तांदूळ अशी सात किंवा नऊ प्रकारची धान्यं पेरली जातात. या मातीच्या मध्यभागी पाण्याचा तांब्या ठेवला जातो आणि त्यावर नारळ ठेवून पूजा केली जाते. नऊ दिवस या घटाला पाणी घातलं जातं. जशी जशी नऊ दिवसांत ती धान्यं अंकुरतात, तशी तशी घरामध्ये समृद्धी येत असल्याचं मानलं जातं. या अंकुरांच्या रंगावरून आणि वाढीवरून येणाऱ्या वर्षातील पिकांचा अंदाज लावण्याची वैज्ञानिक परंपरा आपल्या पूर्वजांनी जोपासली आहे. हे अंकुर म्हणजेच निसर्गाच्या जिवंतपणाचा पुरावा आहेत. त्याचप्रमाणे घटावर नऊ दिवस रोज फुलांची माळ सोडली जाते. यालाच ‘माळ बंधन’ म्हणतात. रोज एका विशिष्ट फुलाची माळ देवीला अर्पण करून निसर्गाच्या विविध रूपांचे आभार मानले जातात. ग्रामीण भागात घटस्थापनेच्या काळात शेतकरी आपल्या घरातील जुनी शस्त्रं, नांगर आणि अवजारं साफ करून त्यांची पूजा करतात, कारण याच साधनांच्या बळावर त्यांचं जीवन चालतं.

वर्षातून दोन मुख्य नवरात्री येतात एक चैत्र नवरात्र आणि दुसरी शारदीय नवरात्र . हे दोन्ही काळ म्हणजे ऋतुबदलाचे संधीकाळ असतात. चैत्र नवरात्रीच्या वेळी हिवाळा संपून उन्हाळा सुरू होत असतो, तर शारदीय नवरात्रीच्या वेळी पावसाळा संपून हिवाळा सुरू होत असतो. जेव्हा ऋतू बदलतात, तेव्हा आपल्या सभोवतालच्या वातावरणात जीवाणू आणि विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतो. या काळात मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सर्वात कमकुवत असते. आपली पचनसंस्था या वातावरणातील बदलांमुळे मंदावते. अशा वेळी जर आपण जड, तेलकट किंवा मांसाहारी अन्न खाल्लं, तर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच, आपल्या ऋषीमुनींनी या नऊ दिवसांत उपवास करण्याचा नियम लागू केला. उपवास म्हणजे शरीराला आणि पचनसंस्थेला दिलेली विश्रांती. नवरात्रीच्या उपवासात धान्य न खाता फळं, दूध, साबुदाणा, भगरीसारखे हलके पदार्थ खाल्ले जातात. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि शरीर आतून स्वच्छ होतं, ज्याला आजच्या भाषेत डिटॉक्सिफिकेशन म्हणतात. शिवाय, नऊ दिवस सात्त्विक आहार घेतल्यामुळे मन शांत होतं, तामसी प्रवृत्ती कमी होते आणि मानसिक एकाग्रता वाढते. उपवास हा केवळ अन्नाचा नसतो, तर तो वाईट विचारांचा, क्रोधाचा आणि मोहाचाही असतो. शरीराला शुद्ध करून आगामी ऋतूसाठी सज्ज करण्याचं हे एक उत्कृष्ट आरोग्यशास्त्र आहे.

देवी दुर्गेची नऊ रूपे आणि त्यांचे महत्त्व ( Navratri Significance )

नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे स्त्री शक्तीच्या नऊ वेगवेगळ्या पैलूंचे दर्शन आहे. देवी दुर्गेची ही नऊ रूपं मानवी जीवनातील नऊ वेगवेगळ्या अवस्था आणि भावनांचे प्रतिनिधित्व करतात. पहिल्या दिवशी पूजा केली जाते ‘शैलपुत्री’ देवीची. हिमालयाची कन्या असलेली ही देवी दृढतेचं आणि स्थिरतेचं प्रतीक आहे. जीवनात कोणताही संकल्प पूर्ण करण्यासाठी मनाची स्थिरता आवश्यक असते, हे ही देवी शिकवते. दुसऱ्या दिवशी ‘ब्रह्मचारिणी’ रूपाची आराधना होते. हे रूप तपश्चर्या, ज्ञान आणि संयम यांचं प्रतीक आहे. ध्येय प्राप्तीसाठी किती कष्ट घ्यावे लागतात, याचं हे रूप उदाहरण आहे. तिसऱ्या दिवशी ‘चंद्रघंटा’ देवीची पूजा होते. तिच्या कपाळावर तासाच्या आकाराचा चंद्र आहे. हे रूप शांतता आणि शौर्य या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा सांभाळाव्यात, याचं मार्गदर्शन करतं. चौथी देवी आहे ‘कूष्मांडा’. जिने आपल्या मंद हास्याने या ब्रह्मांडात प्रकाशाची निर्मिती केली. ही देवी सृजनशक्ती आणि आनंदाची देवता आहे.

पाचव्या दिवशी ‘स्कंदमाता’ रूपात देवीची पूजा केली जाते. कार्तिकेयाची माता असलेली ही देवी मातृत्वाचं, वात्सल्याचं आणि संरक्षणाचं परम रूप आहे. सहाव्या दिवशी ‘कात्यायनी’ देवी प्रकट होते. ऋषी कात्यायन यांच्या आश्रमात जन्मलेली ही देवी अन्यायाविरुद्ध लढणारी रणरागिणी आहे. सातवा दिवस अत्यंत उग्र अशा ‘कालरात्री’ देवीचा असतो. काळोखासारखा काळा रंग असलेली ही देवी सर्व प्रकारच्या भीतीचा आणि संकटांचा नाश करते. ती वाईट प्रवृत्तींसाठी काळ आहे, तर भक्तांसाठी शुभंकरी आहे. आठव्या दिवशी ‘महागौरी’ची पूजा केली जाते, जी अत्यंत पवित्र, शांत आणि सौंदर्याचं प्रतीक आहे. नवव्या दिवशी ‘सिद्धिदात्री’ देवीची पूजा होते, जी सर्व प्रकारच्या सिद्धी आणि ज्ञान देणारी आहे. हे नऊ दिवस आपल्याला सांगतात की एका स्त्रीमध्ये संहार करण्याची ताकद जशी आहे, तशीच सृजनाची आणि वात्सल्याची मायाही आहे.

नवरात्रीचे नऊ रंग आणि त्यामागील अर्थ ( Navratri 9 Colours )

आजकाल नवरात्रीमध्ये नऊ दिवसांच्या नऊ रंगांचे कपडे घालण्याची एक मोठी क्रेझ पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या काळात ही केवळ एक फॅशन वाटू शकते, पण या रंगांच्या मागेही एक मानसशास्त्रीय आणि अध्यात्मिक विचार आहे. हे रंग निसर्गातील ऊर्जेचे वाहक मानले जातात. पहिल्या दिवसाचा रंग सहसा पिवळा किंवा नारिंगी असतो. पिवळा रंग हा ज्ञान, समृद्धी आणि ऊर्जेचा प्रतीक आहे. तो मनात सकारात्मकता निर्माण करतो. दुसऱ्या दिवशी हिरवा रंग वापरला जातो, जो निसर्गाचा, वाढीचा आणि सुभक्तेचा रंग आहे. तिसरा रंग राखाडी किंवा करडा असतो, जो तटस्थता आणि संकटांशी लढण्याची तयारी दर्शवतो. चौथ्या दिवशी केशरी किंवा नारिंगी रंगाची उधळण होते, जो त्याग, शौर्य आणि उत्साहाचा रंग आहे. पाचव्या दिवशी पांढरा रंग शांतता, पवित्रता आणि स्वच्छतेची जाणीव करून देतो. सहाव्या दिवशी लाल रंग ऊर्जेचा, शक्तीचा आणि प्रेमाचा आविष्कार घडवतो. सातव्या दिवशी रॉयल ब्लू म्हणजेच गडद निळा रंग अथांगतेचं आणि आत्मविश्वासाचं प्रतीक बनतो. आठव्या दिवशी गुलाबी रंग करुणा आणि वात्सल्याची भावना दृढ करतो, तर नवव्या दिवशी जांभळा रंग महत्त्वाकांक्षा आणि अध्यात्मिक उंची गाठण्याची प्रेरणा देतो. जेव्हा संपूर्ण समाजातील लोक एकाच रंगाचे कपडे घालून एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यामध्ये एकतेची आणि समभावाची एक सुप्त लाट निर्माण होते. हा रंगांचा उत्सव मानवी मनाला नैराश्यातून बाहेर काढून उत्साहाच्या शिखरावर नेतो.

भारताएवढी सांस्कृतिक विविधता जगात कुठेच नसेल आणि या विविधतेचं सर्वात सुंदर रूप नवरात्रीत पाहायला मिळतं. वेगवेगळ्या राज्यांत हा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने पण एकाच श्रद्धेने साजरा केला जातो. महाराष्ट्रात नवरात्र म्हणजे कुलदेवतेचा गोंधळ आणि जोगवा. तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी या साडेतीन शक्तीपीठांवर लाखो भाविक नतमस्तक होतात. घराघरांमध्ये घट बसवले जातात. अष्टमीला ‘ललिता पंचमी’ आणि ‘तांबूल’ देण्याची प्रथा आहे. शेवटी दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं लुटून एकमेकांना समृद्धीची शुभेच्छा दिली जाते. गुजरातमध्ये हा उत्सव ‘गरबा’ आणि ‘दांडिया’च्या रंगात न्हाऊन निघतो. तिथे मातीच्या छिद्र असलेल्या मडक्यात दिवा लावून तो मध्यभागी ठेवला जातो, ज्याला ‘दीप गर्भ’ म्हणतात. या दिव्याभोवती गोल फिरत टाळ्यांच्या तालावर नृत्य केलं जातं, ज्याला गरबा म्हणतात. हा गरबा म्हणजे स्त्रीच्या गर्भातील जिवंतपणाचा आणि सृजनाचा उत्सव आहे. नऊ रात्री चालणारा हा जगातील सर्वात मोठा नृत्य उत्सव मानला जातो.

हेही वाचा : गरबा की दांडिया? दोन्ही एकच समजत असाल तर थांबा! नृत्य, परंपरा अन् वेळेत नेमका काय फरक?

पश्चिम बंगालची दुर्गापूजा ( Navratri History )

पश्चिम बंगालमध्ये नवरात्र म्हणजे ‘दुर्गा पूजा’. तिथला उत्साह काही वेगळाच असतो. अत्यंत भव्य आणि कलात्मक पंडाल उभारले जातात. तिथे देवी दुर्गेची महिषासूर मर्दिनीची भव्य मूर्ती स्थापन केली जाते. षष्ठी ते दशमी या काळात बंगालमध्ये जणू स्वर्ग अवतरतो. शंखाचा नाद, ढाकचा आवाज आणि धुनुची नृत्य यामुळे वातावरण भारावून जातं. विजयादशमीच्या दिवशी विवाहित महिला एकमेकींना सिंदूर लावून ‘सिंदूर खेला’ खेळतात आणि देवीला जड अंतःकरणाने निरोप देतात. उत्तर भारतात या नऊ दिवसांत ‘रामलीला’ सादर केली जाते. प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित नाटकं ठिकठिकाणी होतात आणि दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या मोठ्या पुतळ्याचं दहन करून अधर्मावर धर्माचा विजय साजरा केला जातो. दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडू आणि कर्नाटकात ‘बोम्माई कोलू’ म्हणजेच लाकडाच्या आणि मातीच्या बाहुल्यांची पायऱ्यांवर मांडणी केली जाते. म्हैसूरचा दसरा तर जगप्रसिद्ध आहे, जिथे राजवाड्याला लाखो दिव्यांनी सजवून हत्तीवरून देवीची मिरवणूक काढली जाते.

आधुनिक काळातील नवरात्रीचा संदेश ( Navratri Festival )

आजच्या आधुनिक आणि गतीमान युगात नवरात्र आपल्याला काय शिकवते? हा केवळ नऊ दिवस गरबा खेळण्याचा किंवा उपवास करण्याचा सण नाही. नवरात्रीचा खरा संदेश आहे आपल्या आतल्या आणि बाहेरच्या वाईट प्रवृत्तींचा नाश करणे. महिषासूर हा केवळ एक राक्षस नव्हता, तर तो आपल्या मनात लपलेल्या काम, क्रोध, लोभ, अहंकार आणि आळसाचं प्रतीक आहे. या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची पूजा करताना आपण आपल्यातील या दुर्गुणांवर विजय मिळवायचा असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, नवरात्र हा स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा उत्सव आहे. ज्या समाजात देवीची पूजा केली जाते, त्याच समाजात जन्माला येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा, तिच्या कर्तृत्वाचा आणि तिच्या स्वाभिमानाचा आदर झाला पाहिजे. घर सांभाळणारी आई असो, शेतात राबणारी महिला असो वा कॉर्पोरेट जगात यशाची शिखरे सर करणारी रणरागिणी असो, प्रत्येक स्त्रीमध्ये देवी दुर्गेचा एक अंश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts