गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आपली जमीन सुपीक, कसदार व चांगल्या प्रतीची करण्यासाठी या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. आज मुखेड तालुक्यातील हिब्बट ते माऊली आणि पुढे आळंदीपर्यत अशा 9 कि.मी नालाखोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी ए.एस.काबंळे, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी भोजराज, उपविभागीय जलसंधारण अधिकारी कातडे, अनुलोमचे विश्वनाथ देशमुख, मोटरगाचे सरपंच शेळके, हिब्बटचे सरपंच केंद्रे, नंदगावचे सरपंच हनमंत पाटील, नाम फाऊंडेशनचे राजाभाऊ शेळके तसेच परिसरातील शेतकरी आदींची उपस्थिती होती
जलयुक्त शिवार 2.0 या महत्वाकांक्षी योजनेमधून जिल्ह्यात अनेक जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. तलाव, नाले यातील काढलेल्या गाळामुळे तलाव व नाल्याची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून त्यातून निघालेला गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पसरविण्यासाठी उपयोगात आणावा. या योजनेच्या उद्दिष्टामुळे पाण्याच्या स्त्रोतात वाढ होवून शेतकऱ्यांच्या जमीनी सुपिक होण्यास मदत होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत निघालेला गाळ नेण्यासाठी प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही राहुल कर्डिले यांनी केले आहे.