गणेशोत्सवाला अजून एक महिना अवधी असतानाच शहरासह जिल्ह्यात गणेश मूर्तींच्या बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सध्या जवळपास 80 टक्क्यांहून अधिक मूर्ती बुक झाल्या असून, उर्वरित मूर्तीही लवकरच विक्रीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. वाढत्या मागणीमुळे मूर्ती विक्रेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदा मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याने मूर्तीच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, गोंद, सजावटीच्या वस्तू यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहर व ग्रामीण भागात मिळून तब्बल 5 ते 6 कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचा अंदाज आहे. गणपतीच्या आगमनासाठी भाविकांची तयारी सुरू असून पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींनाही वाढती मागणी आहे.