महाराष्ट्र सरकारनं गेल्या आठवड्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचा पगार गणेशोत्सवानिमित्त 26 ऑगस्टला देण्याचा निर्णय जाहीर केला होता. यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखील 26 ऑगस्टला पगार देण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. एसटी कर्मचाऱ्यांना देखील गणेशोत्सवानिमित्त 26 ऑगस्टला पगार दिला जाणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी राज्य शासनाकडून जुलै महिन्याच्या सवलतमूल्यापोटी प्रतिपूर्ती म्हणून 477 कोटी रुपयांचा निधी वर्ग करणारा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे…
एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवासाठी या महिन्यात लवकर म्हणजे उद्या केला जाणार आहे. त्याप्रमाणं एसटी कर्मचाऱ्यांना देखील पगार लवकर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील होतं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील एस टी कर्मचारी पगाराची फाईल मागच्या आठवड्यात वित्त विभागाकडे पाठवली होती आणि लवकर निधी देण्याचे मागणी केली होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या त्या मागणीला यश आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना देखील उद्या पगार मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात 7 ते 10 तारखेपर्यंत पगार दिला जातो. मात्र, या महिन्यात खास बाप्पासाठी परिवहन मंत्रांनी लवकर पगार करण्याचे दिले आदेश दिले आहेत.
एसटी महामंडळाला 477 कोटी रुपये वर्ग
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला जुलै महिन्याच्या सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी 477.25 कोटी रुपये देण्यास मान्यता देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामुळं एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांचे वेतन उद्या होणार
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार उद्या होणार असल्याचं जाहीर केलं आहे. अजित पवार यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट केली आहे. अजित पवार म्हणाले, श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तमाम सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचं वेतन आणि निवृत्ती वेतन हे उद्या, अर्थात 26 ऑगस्टला त्यांच्या बँक खात्यात जमा होईल