आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा हा भारतीय परंपरेतील विशेष दिवस आहे. आपल्याला लहानपणी बोलायला शिकवणारी, हाताला धरून चालायला शिकवणारी, चांगल्या संस्कारांची गोडी लावणारी आई म्हणजे आपली पहिली गुरु. शाळेत गेल्यावर आपल्याला शिकवणारे, आपल्या पहिल्या गुरूने दिलेल्या संस्काराच्या शिदोरीत भर घालणारे शिक्षक म्हणजे दुसरे गुरु. याच गुरूंचे पूजन करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हंटले जाते. या खास दिवसाला आपल्याला एकलव्याची कथा सांगितली जाते. गुरुने शिकवलं नाही, तरी त्याच्या प्रतिमेला गुरु मानून एकलव्याने अद्भुत कौशल्य प्राप्त केलं. हे आकंठ सांगण्याचे कारण म्हणजे यात “श्रद्धा आणि समर्पण” हे मूलगामी मूल्य आहेत. पूर्वीच्या काळापासून गुरु शिष्य परंपरा अखंड चालत आली आहे. परंतु आजच्या डिजिटल युगात ही परंपरा विस्कळीत झाल्याचे आणि गुरुची व्याख्या पूर्णपणे बदलल्याचे दिसते.
शिक्षण प्रणाली बदलली, पण गुरूचं महत्व अजूनही तेवढंच
“ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे….”. ही संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून आलेली ओवी. यातून घेण्यासारखा संदेश म्हणजे ज्ञानाचा वाटा वाढवणे. या ओवीचा अर्थ असा होतो की, ज्ञान दिल्याने आपले ज्ञान कमी होत नाही, उलट जेव्हा आपण ज्ञान इतरांना देतो, तेव्हा आपल्या स्वतःच्या ज्ञानात अधिक वाढ होते. हे ज्ञान एक असं मंदिर आहे, जिथे आत्मा शुद्ध होतो आणि मनुष्य प्राणी एकमेकांना मदत करण्यासाठी नवीन रस्ता शोधतात. पूर्वी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आप्तेष्टांच्या भेटीगाठी होणे, जुन्या गुरुशिष्यांची भेट होणे हे नियोजित असायचे. परंतु आताच्या काळात कोणत्याही सणाच्या निमित्ताने आप्तेष्टांच्या भेटीगाठी होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. परंतु आजच्या युगात नवीन तंत्रज्ञान आले, जग डिजिटल झाले, शिक्षणाची पद्धत बदलली, गुरुचं स्वरूपही बदललं, पण गुरूचं महत्व अजून तेवढं आहे का?
गुरुशिवाय दिशा मिळत नाही आणि दिशा नसली तर प्रगतीही होत नाही
कोरोना महामारीच्या काळानंतर ऑनलाईन शिक्षण प्रणाली अस्तित्वात आली. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल गुरु यामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे बघायला मिळते. म्हणूनच आजच्या पिढीचे गुरु डिजिटल झालेत. यामध्ये खास करून चॅट जीपीटी, युट्युब, गुगल, ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म्स यांचा सहसा समावेश होतो. या डिजिटल माध्यमातुन आजची पिढी शिकत असते. लहान मुलांच्या मनात असलेले प्रश्न , विविध आयडिया मिळवण्यासाठी चॅट जीपीटी काही सेकंदाच्या आत उत्तर शोधून देतो. युट्युबवर असलेले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओस मुलांच्या ज्ञानात भर पाडतात. ऑनलाईन लर्निंग ऍप्स नवीन काहीतरी शिकण्यास मदत करतात. कोणत्या ना कोणत्या डिजिटल माध्यमातून मुलं ज्ञान आत्मसात करत असतात. म्हणजे ते एक डिजिटल गुरू झालेत ना? याचा अर्थ गुरुचं महत्त्व अजूनही तेच आहे. गुरुशिवाय दिशा मिळत नाही आणि दिशा नसली तर प्रगतीही होत नाही.
ऑफलाईन शिक्षण प्रणालीत तंतोतंत चालणारी गुरु शिष्य परंपरा पुन्हा सुरु करण्याची गरज
डिजिटल युगात ज्ञानाची अदान प्रदान करण्याची पद्धत बदलली, याचे जसे फायदे झाले तसेच तोटेही झालेत. ऑनलाईन पद्धतीने आजची पिढी कितीही पॉजिटीव्ह गोष्टी शिकत असली तरी त्याचा तोटा म्हणजे डिजिटल माध्यमांचं व्यसन लागलं, एका जागी बसून शिक्षण घेण्याची सवय मोडली, मोबाईल शिवाय राहणे अशक्य झाले, सर्वात महत्वाचा तोटा म्हणजे मोठ्यांचे मिळणारे मार्गदर्शन आणि आजच्या पिढीचा आत्मविश्वास खचला. डिजिटल गुरूने ज्ञानाची अदान प्रदान केली, मात्र माणसा-माणसांमधला संवाद संपला. तंत्रज्ञानामुळे गुरु-शिष्य परंपरेला एक नवा आकार मिळाला असला तरी, ज्ञानाचे अदान-प्रदान, मार्गदर्शन आणि शिष्यांचा आत्मविश्वास हे अजूनही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ऑफलाईन शिक्षण प्रणालीत तंतोतंत चालणारी गुरु शिष्य परंपरा पुन्हा सुरु करण्याची गरज असल्याचं जाणवतं. गुरुपौर्णिमेचे महत्व आजच्या पिढी मध्ये रुजवणे महत्वाचे आहे.
यंदा गुरुपौर्णिमेनिमित्त आजच्या पिढीला गुरुपौर्णिमेचं खरं महत्त्व समजवणं ही आपली जबाबदारी आहे. हा दिवस जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या प्रत्येक गुरुचं स्मरण करण्याचा आहे मग ते आईवडील असोत, शिक्षक, एखादा मित्र, वरिष्ठ, की एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व. या गुरुपौर्णिमेला ठरवूया – आपणही कोणाच्या तरी ज्ञानयात्रेचा मार्गदर्शक बनू…!