सलग तिसऱ्या दिवशी मुंबई व परिसरात मुसळधार पावसाने ठप्प परिस्थिती निर्माण केली आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी करून जोरदार ते अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते व उपमार्ग बंद झाले, स्थानिक रेल्वे व विमानसेवा विस्कळीत झाली. शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आली असून खासगी कार्यालयांना Work from home चा सल्ला दिला आहे. सेंट्रल, हार्बर पाठोपाठ वेस्टर्न रेल्वेमार्गावरही वाहतूक ठप्प! वसई ते विरार स्थानकांदरम्यान ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल ट्रेनचा खोळंबा झाला आहे. काही जिल्ह्यांतील नद्या धोक्याच्या पातळीवर आल्या आहेत. आजार वाढल्याने आरोग्य विभागही सतर्क आहे. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईने अलीकडे विक्रमी पावसाच्या घटना अनुभवल्या १६ ऑगस्ट रोजी १३ वर्षांतील तिसऱ्या क्रमांकाचा ऑगस्ट महिन्यातील पाऊस पडला तर मे २०२५ मध्ये १०७ वर्षांतील सर्वाधिक मे महिन्यातील पाऊस पडला होता. मात्र, सध्याचा ऑगस्ट पाऊस विक्रमी ठरेल असे दिसत नाही.