चांदिपूर, ओडिशा मध्ये 20 ऑगस्ट 2025 ला
भारताने बुधवारी आण्विक क्षमतेच्या अग्नी-५ मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी केली. ओडिशातील चांदिपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (ITR) वरून झालेल्या या प्रक्षेपणावर स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडने देखरेख ठेवली. या चाचणीत क्षेपणास्त्राची सर्व तांत्रिक व कार्यकारी मापदंड पूर्णपणे सिद्ध झाले.
ही चाचणी अग्नी-5 ची गेल्या 18 महिन्यांतील दुसरी मोठी कामगिरी आहे. 11 मार्च 2024 रोजी ‘मिशन दिव्यास्त्र’ अंतर्गत झालेल्या मागील चाचणीत भारताने MIRV (Multiple Independently Targetable Re-entry Vehicle) तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रदर्शन केले होते ज्यामुळे एका क्षेपणास्त्रातून अनेक अण्वस्त्र वॉरहेड्स वेगवेगळ्या लक्ष्यांवर डागता येतात.
5000 किलो मीटर पेक्षा अधिक मारक क्षमतेमुळे, अग्नी-5 क्षेपणास्त्र आशियातील जवळपास सर्व देशांपर्यंत व युरोपातील काही भागांपर्यंत पोहोचू शकते. त्याचे रस्ता-चलनशील (road-mobile) व कॅनिस्टर-लाँच डिझाइन तातडीने तैनातीची क्षमता वाढवते, ज्यामुळे भारताची आण्विक प्रतिकारशक्ती (deterrence) अधिक मजबूत झाली आहे.
संरक्षण तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानसोबतच्या लष्करी संघर्षानंतर काही महिन्यांतच झालेली ही चाचणी भारताच्या सामरिक सामर्थ्याचा स्पष्ट संदेश देते.
अग्नी-5 क्षेपणास्त्र हे भारताच्या दीर्घ पल्ल्याच्या प्रहार क्षमतेचा मुख्य आधार मानले जाते आणि यशस्वी चाचणीमुळे देशाने पुन्हा एकदा जागतिक स्तरावरील प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात आपली भक्कम उपस्थिती सिद्ध केली आहे
लेखक – अमित आडते