मुंबई : महाराष्ट्राच्या महायुती सरकारने सत्ता स्थापन होताच राज्यभरातील महिलांसाठी विशेष योजनेची घोषणा करून त्यांना खास भेट दिली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेच्या अंतर्गत महिलांना विशेष हप्ता दिला जात होता. या योजनेचा उद्देश महिलांना सक्षम आणि त्यांच्या आर्थिक विकासाला हातभर लावण्याचा होता. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा महिलांना 1500 रुपये देण्यात येत आहेत. आतापर्यंत या योजनेतून महिलांना 13 हप्ते मिळाले असून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यांची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे. यासंदर्भात महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी मोठी अपडेट दिली आहे. त्यांच्या सोशल मीडियाच्या अधिकृत पेजवरून त्यांनी ‘लाडकी बहीण योजना’ बद्दल माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट हप्ता अजून आला नसल्याने राज्यभर महिला वर्गामध्ये त्याबद्दल चर्चा होती. त्यातच “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” अंतर्गत राज्य सामाजिक न्याय विभागाने सुमारे ३४४ कोटींचा निधी दुसऱ्या विभागातून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. राज्यभरातील लाभार्थी महिलांना या योजनेंतर्गत दरमहा ₹१,५०० ची आर्थिक मदत वेळेवर मिळावी असे त्याचे ध्येय आहे. सरकारने या लाडकी बहीण योजनेचे वाटप बजेट नियमानुसार असून निधीचे वर्गीकरण सुद्धा बजेटनुसार असल्याचे सांगितले आहे. परंतु, या दुसऱ्या विभागातून घेतलेल्या अधिकच्या निधीमुळे सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागावर ताण पडला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारवर लाडकी बहीण योजना सुरु असताना मोठी आर्थिक जबाबदारी असल्याने राज्यातल्या महिला वर्गाला हे सहाय्य महत्त्वाचे मानलं जातं आहे.
राज्यभरात आजपासून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात तो हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याची माहिती राज्यमंत्री महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत पेजवरून दिली आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती!” असा मथळा लिहीत लवकरच सर्व पात्र लाभार्थ्या बहिणींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरु असल्याचे सांगितले. त्याचबरोबर या योजनेमुळे माता-भगिनींना आर्थिक सन्मान देऊन सक्षम करण्यात आपण योग्य वाटेवर आहोत असेही त्यांनी म्हंटले.
मुंबईत राज्यमंत्री महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले असून या योजनेअंतर्गत मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महिलांसाठी व्यावसायिक कर्जसाठी योजना सुरू करावी. त्याचसोबत या योजनेची सांगड महामंडळांच्या व्याज परतावा योजनेशी घालण्याबाबत बँकेने शासनाला विनंती केली. बँकेने महिलांची ५३,३५७ शून्य शिल्लक बचत खाती उघडून विशेष अभियान राबवले असून, यावर आधारित व्यावसायिक कर्ज योजनेसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ, इतर मागास विकास मंडळ तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांनी पुढील आठ दिवसांत करार करावा, असे निर्देश तटकरे यांनी दिले.
बैठकीत विधान परिषदेचे गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी ही योजना महत्त्वाची असल्याचे सांगत तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच सहकार
आयुक्तांनी टाकलेल्या काही अटी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अडचणीच्या ठरत असल्याने त्या रद्द कराव्यात, योजनेच्या शासन निर्णयात बदल करावेत, अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी पूर्वीच या संदर्भात सकारात्मक आदेश दिले होते, त्यावर पुढील कारवाई करण्याचे निर्देश आज तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले. या निर्णयामुळे महिलांसाठीची कर्ज योजना आणि व्याज परतावा योजना अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे काय?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील माता-भगिनींसाठी सुरू केलेली सन्मान निधी योजना आहे. या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला सक्षम बनवत कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे असा आहे. ही योजना महिलांसाठी एक क्रांती म्हणून ओळखली जाते.
या योजनेची सुरुवात कधी झाली?
महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेला 28 जून 2024 रोजी मान्यता देऊन जुलै 2024 पासून तिची अंमलबजावणी सुरू केली. योजनेचे ऑनलाइन अर्ज 1 जुलै 2024 पासून सुरू झाले होते.
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
राज्यभरातील 21 ते 65 वर्षांच्या वयोगटातील पात्र महिलांना हा लाभ मिळणार असून लाभार्थी महिला राज्याची रहिवासी असावी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असावी. विवाहित, अविवाहित, विधवा किंवा परित्यक्ता महिलांना पात्र ठरवलं जातं.