छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केलं आहे की, शहरातील अतिक्रमण जबरदस्तीने हटवण्यात येत नाही. अनेक नागरिक स्वतःहून अतिक्रमण काढत आहेत. धार्मिक स्थळांच्या बाबतीतही काही नागरिक पुढे येऊन सहकार्य करत आहेत. चिकलठाणा येथील हनुमान मंदिराचे अतिक्रमण स्वतःहून हटवण्यात आले असून सर्व धर्मीयांना विश्वासात घेऊनच अतिक्रमण कारवाई केली जात आहे. आवश्यकतेनुसार पर्यायी जागाही देण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापालिकेच्या जागांवर विकासकामं राबवली जातील आणि पंचनाम्यानंतरच मोबदला दिला जाईल. काही नागरिकांमध्ये भूसंपादनासंदर्भात गैरसमज आहेत. नियमांनुसार 5 प्रकारे भूसंपादन करता येते. विनापरवाना बांधकाम वाचवण्यासाठी चुकीची मागणी टाळावी, असंही आवाहन आयुक्तांनी केलं आहे.












