बिलासपूर (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील झंडुता उपविभागातील बल्लू पुलाजवळ झालेल्या भूस्खलनात एक खासगी बस दबून गेल्यानं किमान 15 जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिली.
अचानक ढिगारा खाली कोसळला :
सुमारे 30 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस डोंगराळ भागातून प्रवास करत असताना अचानक ढिगारा खाली कोसळला. भूस्खलनामुळं बस पूर्णपणे गाडली गेली.
बचाव व मदत कार्य सुरू :
अपघातावेळी बसमध्ये एकूण 30 जण होते. स्थानिक रहिवासी आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीनं तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलंय. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असला तरी, इतर सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त : हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख झालं. या कठीण काळात माझ्या संवेदना बाधित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. जखमी लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना करतो. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना 50 हजार रुपये मदत दिली जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दुःखद :
मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनीही या अपघाताबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दुःख व्यक्त केलं. मुख्यमंत्र्यांनी लिहिलं की, “बिलासपूर जिल्ह्यातील झंडुता विधानसभा मतदारसंघातील बालुघाट (भल्लू पूल) जवळ झालेल्या मोठ्या भूस्खलनाच्या बातमीने मला धक्का बसला आहे. या मोठ्या भूस्खलनात एक खासगी बस ढिगाऱयाखाली दबली गेली. यात अनेकांचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी आहे. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.”
भूस्खलन होण्याचं प्रमाण वाढलं :
हिमाचल प्रदेशचा अनेक भाग हा डोंगराळ आहे. येथील शहरं देखील मोठमोठ्या डोंगरांवर वसलेली आहेत. त्यामुळं दळणवळणासाठी रस्ते हे डोंगर कापून बनवले जातात. त्यामुळं पावसाळ्यात येथे भूस्खलन होण्याचं प्रमाण जास्त आहे. भूस्खलन होऊन अनेकांचे मृत्यू देखील झाले आहेत. अशीच एक भयावह घटना मंगळवारी रात्री बिलासपूर इथं घडली.