का मुंबईचे जनजीवन विस्कळीत होते..???
स्वप्नांचं शहर, समुद्र किनारा, आर्थिक चालना देणारं शहर, धावपळीचं शहर म्हणून मुंबईला सगळे ओळखतात. पण जेव्हा पावसाळा सुरु होतो संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबईकडे असते, त्याला कारण ही तसेच आहे की पाऊस आला कि मुंबईचे जनजीवन पूर्ण विस्कळीत होते. याला नेमकं कारण काय? कशामुळे थोडा पाऊस झाला तरी मुंबईची तुंबई होते?
18 ऑगस्ट आणि 19 ऑगस्ट या दोन दिवशी सुमारे 400 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले असून लोकल सेवा ही ठप्प झाली. मुंबईकरांचे नेहमीसारखे हाल झाले. काही उपनगराला पावसाने एवढे झोडपले की रस्ते तुंबून पाणी घरात जाऊ लागले. त्यामुळे नागरिकांना छतावर तर काहींचे दुसरीकडे स्थलांतर करण्यात आले. पण ही परिस्थिती पहिल्यांदा निर्माण झाली नव्हती याआधीही अनेक वेळा पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते.
26 जुलै 2005 मध्ये पहिल्यांदा मुंबईकरांनी महाप्रलय अनुभवला होता. 24 तासात 900 मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली त्यामुळे मिठी नदीला पूर आला होता. या महापुरात सुमारे 1000 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता तर अनेक मुंबईकर बेघर झाले होते. तत्कालीन सरकारला ही याची कल्पना नसल्याने मदतकार्यात अनेक अडथळे आल्याचे सांगितले गेले. या महाप्रलयानंतर जेव्हा या घटनेची चौकशी करण्यात आली तेव्हा वाढती लोकसंख्या, वाढते नदीकाठावरील अतिक्रमण आणि त्यातच कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने महापुराची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली. मिठी नदीमध्ये कारखान्यांचे दूषित पाणी सोबतच किनारी असलेल्या झोपडपट्टीचे सांडपाणी ही नदीत सोडल्याने मिठी नदीत जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. समुद्रकिनारी मातीचे खच टाकून बांधकाम केल्याने समुद्रात ही पाणी सामावून घेण्याची क्षमता कमी झाली. अशा अनेक कारणाने मुंबई नेहमी तुंबते.
सध्या अजूनही मुंबईची परिस्थिती अशीच आहे. मिठी नदीला अजूनही पूर येतो, त्यात अनेक घर उद्धवस्थ होतात. समुद्राला आहोटी आल्यावर समुद्राचे पाणी नदीत येते आणि याला कारणं हीच की वाढते नागरीकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे नदीकिनारी आक्रमण… यामुळे दरवर्षी मिठी नदीतून मेट्रिक टन एवढा गाळ काढण्यात येतो. यासाठी सरकार उपयोजना करते पण त्याचा फायदा कमी आणि भ्रष्टाचार अधिक असेच चित्र दिसत आहे. यापुढे जर मुंबईला मिठी नदीपुराचा सामना करायचा नसेल तर नदीची साफसफाई करावी लागेल आणि किनाऱ्याचे अतिक्रमण हटवावे लागेल…..












