भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन असून त्यांच्या जन्म दिनानिमित्त देशात विविध उपक्रम राबविले जातात. यावर्षी देखील विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाजप देखील त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आज म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. यंदा त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज रात्री 8 वाजता पुण्यात हायटेक सुविधांनी सज्ज असलेल्या ड्रोन शो चे आयोजन करण्यात आले आहे. हा शो पुण्यातील एस.पी महाविद्यालयाच्या मैदानात होणार असून या उपक्रमाचे आयोजन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केला आहे. या कार्यक्रमावेळी ड्रोन शो सह अवधूत गुप्ते यांचा लाईव्ह कॉन्सर्ट देखील होणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने राबवण्यात येणारा ज्योतीने तेजाची आरती हा ड्रोन शो 45 मिनिटे चालणार असून त्यात मोदी सरकारने केलेल्या कामगिरीचे कौतुकास्पद दृश्यांसह पुण्यातील सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक मानबिंदूचे दर्शन घडवणारे दृश्य पुणेकरांना पाहायला मिळणार आहे. जेव्हा हजारो ड्रोन आकाशात झेपावतील तेव्हा संपूर्ण परिसर रोषणाईने उजळून निघेल. आणि पुणेकरांना 45 मिनिटांत अद्भुतपूर्व थरार बघायला मिळेल. हा ड्रोन शो 3 ते 4 किलोमीटर परिसरातील नागरिकांना पाहता येणार आहे.
पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच सहाय्यता शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 1200 पेक्षा जास्त दिव्यांग बांधवाना 1750 अत्यावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात येणार असून या शिबिराचे आयोजन 2 ते 6 वाजेच्या दरम्यान करण्यात आले आहे.