शिवसेना (उद्धव बाळासाहेबर ठाकरे) पक्षाचे फायरब्रांड नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. राऊत यांनी स्वत:च आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही महिने सार्वजनिक कार्यक्रमातून दूर राहावं लागणार आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना गर्दीत मिसळण्यास आणि बाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मी लवकरच बरा होऊन नवीन वर्षात सर्वांना भेटेन, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.
संजय राऊत यांनी आपल्या एक्स या सोशल मिडिया अकाउंटवर मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांना उद्देशून एक भावनिक आवाहन केलं आहे. “आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत उपचार सुरू असून मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणं आणि गर्दीत मिसळणं यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. राऊत यांनी आपल्या समर्थकांना धीर देत म्हटलं आहे की, “मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीवीद असेच राहू द्या,” असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 31, 2025
बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत झाले तयार..
खासदार संजय राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले आहेत. राऊत हे आपल्या शाब्दिक हल्ल्यांनी विरोधकांना कायम घायाळ करून सोडतात. सध्या ते ‘सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक देखील आहेत. ते अग्रलेखांच्या माध्यमातून आपल्या पक्षाचा आवाज बुलंद करत असतात आणि विरोधकांना फेस आणून सोडतात.
हे ही वाचा – बीड पुन्हा चर्चेत! उपमुख्यमंत्र्याची बनावट सही, शिक्का वापरणारा सरपंच पोलिसांच्या ताब्यात
निवडणूक काळात उणीव भासणार..
ठाकरे पक्षाची बाजू दररोज प्रसारमाध्यमांसमोर मांडत असतात. संवाद साधत विरोधकांच्या टीकेचा समाचार घेण्याचं कामही राऊत करत असतात. त्यामुळे ऐन महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर संजय राऊत यांच्यासारखा फायरब्रांड नेत्या असा आजारी पडल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला निवडणूक काळात त्यांची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. मी नवीन वर्षांत पुन्हा सक्रिय होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला असून त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, यासाठी आता त्यांचे समर्थक प्रार्थना करत आहेत.
तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना; पंतप्रधान
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संजय राऊत त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना केली आहे. संजय राऊत जी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, तसेच तुमच्या उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
Praying for your speedy recovery and good health, Sanjay Raut Ji.@rautsanjay61 https://t.co/nGgRFO4AhS
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2025












