राजकारणासाठी दरवेळेस का म्हणून महापुरुषांचा अपमान केला जातो, हा खरंच चिंतेचा विषय आहे. आजच्या राजकीय वातावरणात महापुरुषांचा अपमान हा गंभीर विषय ठरू लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, तथागत बुद्ध यांसारख्या थोर नेत्यांचे विचार राजकीय भाषणांमध्ये ऐकायला मिळतात, मात्र अनेकदा हा उल्लेख केवळ मतांसाठी केला जातो. त्यांच्या विचारधारेचा, कार्याचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा विसर पाडून, अनेकजण त्यांचा वापर फक्त आणि फक्त राजकीय स्वार्थासाठी करतात. कुठे त्यांच्या पुतळ्यांवर हल्ले होतात, तर कुठे त्यांच्या विचारांचे चुकीचे अर्थ लावून जनतेला दिशाभूल केली जाते. समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांचा असा अपमान होणं म्हणजे आपल्या संस्कृतीचाच अपमान आहे. त्यामुळे हे सगळं थांबवायला हवं. महापुरुष हे राजकीय साधन नसून, ते समाजासाठी प्रेरणा आहेत, हे प्रत्येकाने आधी लक्षात घेतलं पाहिजे.
महाराष्ट्र असो किंवा इतर कुठलेही राज्य, देशपातळीवर एखादा विषय समोर आला की सर्वात आधी जात, धर्म आणि पंथ यांच्या आधारावर राजकारण तापवले जाते. समाजाला विभागण्याचा प्रयत्न केला जातो आणि सामान्य जनतेच्या भावना उचकटल्या जातात. अशा वेळी, ज्या महापुरुषांनी आपल्या देशासाठी रक्त सांडले, तुरुंगवास सहन केला, बलिदान दिलं, त्यांच्या विचारांवर आणि कार्यावर पाणी फेरलं जातं. त्यांचं नाव घेऊन समाजात तेढ निर्माण केली जाते आणि त्यांच्या दर्जेला कमी करण्याचा प्रयत्न होतो. त्यांच्या विचारांचा स्वतःच्या राजकीय अजेंड्यासाठी विपर्यास केला जातो. काही ठिकाणी त्यांच्या पुतळ्यांची विटंबना होते, काही ठिकाणी त्यांचे फोटो फाडले जातात, तर कुठे त्यांची नावेच वादग्रस्त केली जातात. हे सगळं होत असताना, खरंच आपण त्या महान हिंदुस्थानात राहतोय का, जिथे “वसुधैव कुटुंबकम्” किंवा “सर्व धर्म समभाव” यासारख्या तत्त्वांची शिकवण दिली गेली? आज गरज आहे ती ही, की आपण स्वतःला विचारावं — आपल्या राजकीय मतांसाठी आपण महापुरुषांचा वापर करतोय की त्यांचा आदर ठेवतोय? देशाला एकसंघ ठेवण्यासाठी त्यांचा खरा विचार आपण स्वीकारतोय का? कारण महापुरुष समाजात तेढ निर्माण करण्यासाठी नव्हे, तर बंधुभाव आणि प्रेरणा देण्यासाठी होते.
निवडणुकीच्या वेळेस ज्या मुखाने राजकारणी महापुरुषांचा जयघोष करतात, त्यांचा फोटो छापून आपली प्रचारयंत्रणा चालवतात, त्यांच्या विचारांचा दाखला देऊन जनतेला गृहित धरतात, तेच राजकारणी निवडणूक जिंकल्यानंतर या सगळ्याला सहज विसरून जातात. मग त्यांना अचानक आठवतं की, आपण एका स्वतंत्र संविधान असलेल्या लोकशाही देशात राहतोय.
पण त्याच संविधानाचे, त्याच महापुरुषांच्या विचारांचे रोज पायमल्ली होत असते. उठसुठ कोणताही सबळ आधार नसताना जात, धर्म, पंथ यांच्या नावावर समाजात तेढ निर्माण केली जाते. महापुरुषांच्या नावाचा, विचारांचा, प्रतिमांचा राजकीय वापर करून नंतर त्यांनाच बदनाम केलं जातं, हे फारच दुर्दैवी आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधींनी अहिंसेचा आणि सत्याचा मार्ग दाखवला, “अहिंसा परमो धर्म:” हे केवळ वाक्य नसून जगण्यासाठीचा मूलमंत्र दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जात, धर्म, विषमता याविरोधात लढा देत, भारताला जगातील सर्वोत्तम संविधान दिलं. तरीही, आजही तेच महापुरुष, त्यांचे विचार, त्यांच्या प्रतिमा, त्यांच्या स्मारकांवर राजकीय हेतूने हल्ले होत आहेत. त्यांच्या शिकवणूकीचा अपमान होत आहे. इतकंच नव्हे तर, महापुरुषांच्या पुतळ्यांच्या उद्घाटनावेळी मोठे भाषणं देणारे, स्मारकं बांधणारे राजकारणी ते स्मारक टिकवण्यासाठी त्यांचे विचार रुजवण्यासाठी किती प्रयत्न करतात हा प्रश्नच आहे. समाजामध्ये वाद निर्माण करण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी त्यांच्या विचारांचा उपयोग होतो; पण समाज प्रबोधनासाठी, शिक्षणासाठी किंवा एकात्मतेसाठी मात्र फार कमी लोक पुढे येतात. म्हणूनच, आपल्या देशाला खऱ्या अर्थाने महान बनवायचं असेल, तर महापुरुषांचा केवळ राजकीय वापर न करता त्यांच्या विचारांची खरी अंमलबजावणी करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.